|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » ‘सारथी’ मोडण्याचे कारस्थान; मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका भेदभाव करणारी

‘सारथी’ मोडण्याचे कारस्थान; मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका भेदभाव करणारी 

संजीव खाडे / कोल्हापूर

राज्य मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री असणाऱया विजय वडेट्टीवार यांनी सारथी आणि ‘सारथी’च्या लाभार्थी असणाऱया मराठा-कुणबी विद्यार्थ्यांविषयी केलेली विधाने भेदभाव करणारी आहेत. मंत्री नसताना आणि मंत्री झाल्यानंतर त्यांनी केलेली विधाने गंभीर असून त्यांचा पक्ष असणारा काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. ‘सारथी’चा कारभार ठप्प झाल्यानंतर आता मराठा आणि कुणबी समाजातील संघटना आणि ‘सारथी’चे लाभार्थी, संशोधक विद्यार्थी वडेट्टीवार यांच्यावर भेदभावाचा आरोप करत आहेत.

याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, जून 2019 नागपूर अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाचे 225 विद्यार्थी ‘सारथी’मार्फत दिल्ली येथे यूपीएससी कोचिंगसाठी पाठविले जाण्यावर टीका केली होती. ते त्यावेळेस म्हणाले होते की, आमच्या ओबीसीच्या मुलांनी काय पाप केले आहे. ज्या पद्धतीने मराठा मुलांसाठी सेंटर तयार केलं तसं ओबीसीच्या मुलांसाठी का नाही? असा प्रश्न त्यांनी विधानसभेत विचारला होता. मराठा-कुणबींप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्याना न्याय मिळायला हवा, असे म्हणणारे तेच वडेट्टीवार आता मंत्री झाल्यानंतर ‘सारथी’च्या माध्यमातून लाभ मिळणाऱया मराठा-कुणबी मुलांवर भेदभाव करत वेगळी भूमिका घेत आहेत. ‘सारथी’ आणि डी. आर. परिहारांवर आरोप करून ‘सारथी’च्या प्रकल्पाची बदनामी करत आहेत.

‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांनीही वडेट्टीवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  एका विद्यार्थ्यांने सांगितले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने राणे समिती नेमली होती, त्या समितीने काढलेल्या निष्कर्षात राज्यात तीन कोटी 28 लाख मराठा-कुणबी समाजात डायरेक्ट आयएएस झालेले केवळ हाताच्या बोटावर मोजावे इतके एक किंवा दोन विद्यार्थी होते. त्याच समाजातील ‘सारथी’च्या माध्यमातून दिल्लीत कोचिंगला गेलेल्या 225 विद्यार्थ्यांपैकी 17 जण यूपीएससीच्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. ते यशस्वी होऊन केंदीय सेवेत गेले तर कुणालाही आनंद व्हायला हवा; पण वडेट्टीवारांना त्याबद्दल आनंद झाल्याचे दिसत नाही. उलट ‘सारथी’ने सुमारे 8 कोटी यूपीएससी विद्यार्थ्यांवर उधळण्याचा आरोप त्यांनी केला होता. ‘बार्टी’च्या माध्यमातून 2016 ते 2019 या काळात दरवर्षी अडीचशे ते तीनशे विद्यार्थी दिल्लीत नामांकित कोचिंग सेंटरमध्ये केंद्रीय सेवा परीक्षंच्या प्रशिक्षणासाठी गेले. त्यात दिवसेदिवस वाढ होत आहे. विद्यार्थी पास होत आहेत. त्याच पद्धतीने ‘सारथी’च्या माध्यमातून महाराष्ट्रात एक नंबरची लोकसंख्या असलेल्या मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी केंद्रीय सेवा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी जात असतील. उच्चस्तरीय प्रशासनामध्ये अस्तित्व कुठेतरी निर्माण होण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या अस्तित्वावर घात घालण्याचा प्रयत्न वडेट्टीवार आरोप आणि टीका करून करत आहे की काय?, अशी शंका निर्माण होते, असेही या संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

दहा महिन्यात सारथीचे यश अन् उधळपट्टीचा निराधार आरोप

‘सारथी’च्या माध्यमातून युपीएससी परीक्षेच्या कोचिंगसाठी 225 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत पोहचली. त्यातील 17 विद्यार्थी पास होऊन मुलाखतीस पात्र ठरले. त्याचबरोबर एमपीएससीच्या परीक्षेसाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तरीही वडेट्टीवार कोचिंगवर पैसे उधळल्याचा आरोप करत आहेत. पण त्यांना दहा महिन्यात ‘सारथी’च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले मेठे यश दिसत नाही. आरोप करून ‘सारथी’ला बदनाम करून मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांचे खच्चिकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न नाही ना? असा सवालही संशोधक विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

अनुदान बंद झाल्याने पात्र विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण

‘सारथी’च्या माध्यमातून जे 17 विद्यार्थी युपीएससीची मुख्य परीक्षा पास झाले आहेत, त्यांना मुलाखतीला सामोरे जाण्याआधी राज्य शासनाच्या भक्कम पाठबळाची, योग्य मार्गदर्शकांची गरज आहे. मानसिक जडण-घडण, सर्व विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांना सामोरे जाऊन त्यांना ह्या खडतर मुलाखतीसाठी सामोरे जावे लागणार आहे. मुलाखतीत जर ते यशस्वी झाले तर त्यांची निवड होवून केंद्रीय सेवांमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. अशा प्रसंगी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी वक्तव्ये, विधाने घातक आहेत, त्यामुळे आधीच अनुदान बंद झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने आणि समाजाने या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मराठा-कुणबी समाजातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीतील मराठा नेत्यांचे मौन

वडेट्टीवार ‘सारथी’वर आरोप करत मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचे खच्चिकरण करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत आहेत. राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते शरद पवार यांना ‘सारथी’ विषयी फारसे माहीत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मराठा नेते राजकीय गणितामुळे मराठा-कुणबी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायावर बोलण्यास तयार नाहीत. मराठा-कुणबी समाजात या नेत्यांविषयी रोष निर्माण होत आहे.

Related posts: