|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » कोल्हापुरात साडेनऊ किलो गांजा जप्त, चौघा संशयितांना अटक

कोल्हापुरात साडेनऊ किलो गांजा जप्त, चौघा संशयितांना अटक 

प्रतिनिधी / कोल्हापूर, उचगाव

राजारामपुरी आणि गडमुडशिंगीमध्ये पोलिसांनी कारवाई करत एकूण साडेनऊ किलो गांजा जप्त केला. दोन प्रकरणांमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. राजारामपुरी पोलिसांनी शाहू टा sल नाका ते मोरेवाडी मार्गावर सापळा रचून दोघांना अटक केली. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गडमुडशिंगी येथे  या दोघांकडून 8 किलो गांजा व दोन हँडसेट असा 61 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  सापळा रचून दोघांना अटक

राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी गांजाची विक्री व साठा करणाऱया दोघांना अटक केली. मंजुनाथ फकीरअप्पा मंडपमंडगोडली (वय 23, रा.सिध्दार्थनगर, गोकुळ शिरगाव, ता. करवीर) व अमित शंकर देवमारे (वय, 21, रा.पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत. दीड किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. न्यायालयाने या दोघांना 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी गांजा विक्री करण्यासाठी शाहू टोल नाका ते मोरेवाडी या मार्गावर संशयित मंजुनाथ हा  येणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकाऱयांच्या मदतीने सापळा रचला. संशयितरित्या फिरणाऱया मंजुनाथला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ 640 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. गोकुळ शिरगाव येथील पान टपरीमध्ये आणखी गांजा असल्याची माहिती त्याने दिली. पान टपरीवर छापा टाकून 850 ग्रॅम गांजाही जप्त केला. असा एकूण दीड किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. मंजुनाथने पंढरपूर येथील शंकर मारुती देवमारे व अमित देवमारे यांच्याकडून गांजा विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी देवमारे यालाही अटक केली. दोघांना न्यायालयाने  18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावले. पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे तपास करीत आहेत.

गडमुडशिंगीमध्ये  दोघांवर गुन्हा

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे गांजाची विक्री करणाऱया रमेश संभाजी हिरवे (वय 25, रा.  सोनकट्टाशेजारी गडमुडशिंगी) व स्वप्निल बाळू परळे (वय 25, रा प्रियदर्शनी कॉलनी, उचगाव) या दोघांकडून 8 किलो गांजा व दोन हँडसेट असा 61 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गडमुडशिंगी येथे केली. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील दत्तात्रय इंगवले यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Related posts: