|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अजयुकमार माने अतिरिक्त सीईओ; रवी शिवदास यांची प्रकल्प संचालकपदी बदली

अजयुकमार माने अतिरिक्त सीईओ; रवी शिवदास यांची प्रकल्प संचालकपदी बदली 

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ अधिकाऱयांच्या शुक्रवारी तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुत्रे स्वीकारल्यानंतर जिल्हय़ातील बडय़ा अधिकाऱयांच्या या पहिल्याच बदल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्यांना 30 कोटींचा दलित वस्ती वाटपावेळी झालेल्या गोंधळातून शिवदास यांची तडकाफडकी बदली झाल्याची दबक्या आवाजात जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा होती.

   अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची जिल्हा परिषदेतील प्रकल्प संचालक पदावर तर या पदावर कार्यरत असलेले अजयकुमार माने यांची शिवदास यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर बदली करण्यात आली. अवर सचिव डॉ. वसंत माने यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी पद हे निवड श्रेणीतील आहे. शिवदास यांच्याकडे ती निवडश्रेणी नाही. त्यामुळे निवडश्रेणी असलेले अजयकुमार माने यांची नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

 दरम्यान या बदल्यासोबत भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पवार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानचे अतिरिक्त संचालक आर. यु. शिंदे यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related posts: