|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रत्नागिरीचे ‘ताजमहल’ राज्य नाटय़ स्पर्धेत प्रथम

रत्नागिरीचे ‘ताजमहल’ राज्य नाटय़ स्पर्धेत प्रथम 

प्रतिनिधी / इचलकरंजी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या 59 व्या राज्य हौशी संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरीच्या खल्वायन नाटय़ संस्थेच्या संगीत ‘ताजमहल’ नाटय़ास प्रथम क्रमांक मिळाला.मुंबईच्या अमृत नाटय़ भारती संस्थेच्या संगीत स्वयंवरला द्वितीय क्रमांक मिळाला. दिग्दर्शन, नाटय़लेखन व संगीत दिग्दर्शनामध्येही ताजमहल हे नाटय़ अव्वल ठरले. रत्नागिरी येथील चार नाटय़संस्थांचा या स्पर्धेत सहभाग होता. या पैकी ताजमहल बरोबरच आश्रय सेवा संस्थेच्या संगीत ‘जय जय गौरी शंकर’ या नाटय़ाला तृतीय क्रमांक मिळाला. त्यामुळे यावर्षीच्या राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरीचे वर्चस्व राहिले.

इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटय़गृहात ही संगीत नाटय़ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एकूण 26 नाटय़ संस्थांचा सहभाग होता. यापैकी 23 नाटय़ांचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत गोवा येथील सहभागी नाटय़ संस्थांची संख्या सर्वाधिक होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक नाटय़ संस्थेने उत्कृष्ट सादरीकरण केले. रत्नागिरी येथील परस्पर सहाय्यक मंडळ, वाघंबे, अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहायक मंडळ यांचेसह खल्वायन व आश्रय सेवा संस्थांचा सहभाग होता. यामध्ये खल्वायन नाटय़संस्थेने सादर केलेले संगीत ताजमहल हे नाटय़ सरस ठरले. डॉ. विद्याधर ओक यांनी ताजमहल या सुंदर वास्तुकलाकृती संदर्भात केलेले अभ्यासपूर्ण लेखन व संगीत दिग्दर्शन,  मनोहर जोशी यांचे दिग्दर्शन व हेरंब जोगळेकर यांची उत्कृष्ट तबला साथ यामुळे या नाटय़ाला वेगळी उंची प्राप्त झाली. ताजमहल नाटय़ाला दिग्दर्शन, नाटय़लेखन, संगीत दिग्दर्शन यामध्येही प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे.

दिग्दर्शनामध्ये रत्नागिरीच्या जय जय गौरी शंकर नाटय़ातील नितीन जोशी यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नागपूरच्या बहुजन रंगभूमीने सादर केलेल्या संगीत ‘भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष’ या नाटय़ातील सुरेंद्र वानखेडे यांना नेपथ्याचा प्रथम क्रमांक मिळाला आहे, तर पुणे येथील आगम संस्थेच्या ‘आपुलाची वाद आपणासी’ या नाटय़ातील सिद्धेश नेवसे यांच्या नेपथ्याला द्वितिय क्रमांक मिळाला आहे. गोवा येथील सान्वी कला मंचने सादर केलेल्या ‘म्हणे सोहिरा’ नाटय़ाच्या महादेव हरमलकर यांच्या नाटय़लेखनाला तर मयुरेश कस्त यांच्या संगीत दिग्दर्शनाला द्वितिय क्रमांक मिळाला आहे. या नाटय़ स्पर्धेचे मुख्य समन्वयक श्रीकांत फाटक होते. श्रीमती बकुळ पंडित, श्रीमती योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदिप ओक व सुधीर ठाकुर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

गायनासाठी रौप्यपदक- दत्तगुरू केळकर (नाटय़-तुका आकाशा एवढा), अजिंक्य पोंक्षे (नाटय़-संगीत ताजमहल), संपदा माने (नाटय़- संगीत स्वयंवर), गायत्री कुलकर्णी (नाटय़- संगीत मानापमान)

अभिनयासाठी रौप्यपदक – गुरूप्रसाद आचार्य (नाटय़- संगीत कटय़ार काळजात घुसली), वामन जोग (नाटय़- संगीत ताजमहल), सिद्धि बोंद्रे (नाटय़- संगीत मानापमान), निवेदिता चंद्रोजी (नाटय़- संगीत भाव तोची देव)

Related posts: