|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » solapur » सोलापूर जिह्यातील 61 हजार मातांनी घेतला ‘मातृवंदना’चा लाभ

सोलापूर जिह्यातील 61 हजार मातांनी घेतला ‘मातृवंदना’चा लाभ 

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मातृवंदना योजनेचा जिह्यातील 60 हजार 954 मातांनी लाभ घेतला. या योजनेकरिता तब्बल दोन वर्षात शहरासाठी चार कोटी 19 लाख 100 रुपये तर ग्रामीणकरिता 21 कोटी तीन लाख 86 हजार असे एकूण 25 कोटी 22 लाखांचे अनुदान लाभार्थ्यांना ऑनलाईनद्वारे वितरित करण्यात आले आहे. 

महिलांना गरोदरपणात अशक्तपणा, कुपोषण, सुरक्षित प्रसुती आदीं समस्या सर्रास भेडसावतात. या समस्या दूर करण्यासाठी मातृवंदना योजनेंतर्गत तीन महिन्याच्या गरोदरपणापासून ते बाळाच्या पहिल्या डोसपर्यंत तीन टप्प्यात पाच हजार रुपये मातेला दिले जातात. गरोदरपणात योग्य आहार मिळावा, बाळाची वाढ चांगल्यापध्दतीने व्हावे तसेच खासगी दवाखान्यात होणारा अवाढव्य खर्च टाळत शासकीय दवाखान्यांकडे सर्वसामान्य महिलांचा कल वाढावा, या मुख्य उद्देशाने ही योजना जानेवारी 2017 मध्ये अंमलात आली.

याच उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सन 2003 मध्ये जननी सुरक्षा योजनेस प्रारंभ झाला. यामध्ये महिलेला बाळंतपणानंतर 500 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत असे. तो देखील केवळ अनुसूचित जाती-जमातीमधील महिलांसाठी दिला जात असे. ही रक्कम अत्यंत कमी असल्याने मातृवंदना योजनेत ही रक्कम दहा पटीने वाढवत तब्बल पाच हजार रुपये गरोदर मातेला टप्प्याटप्प्यात देण्यात येते. याचा सकारात्मक परिणामही महापालिका व ग्रामीण रुग्णांलयामध्ये दिसून आला आहे. गरोदर महिला दाखल होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोण असणार लाभार्थी

– शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

– अशासकीय सेवेत असलेले, नसलेले सर्वच जाती-जमातीमधील गरोदर माता लाभार्थी होऊ शकतात.

– केवळ पहिल्याच बाळंतपणासाठी ही रक्कम दिली जाते. 

अशी आहे प्रक्रिया

– महापालिका अथवा ग्रामीण रुग्णालयात तीन महिन्याच्या आत गरोदर मातेची नोंदणी व्हावी. संपूर्ण माहितीद्वारे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येते. मग तिसऱया महिन्यामध्ये लगेच 1000 रुपयांचा पहिला टप्प्यातील रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात.

– दुसरा टप्पा सहाव्या महिन्यात 2000 रुपयांचा मिळतो.

– प्रसुतीनंतर बाळाचे पहिल्या डोस देताना शेवटच्या टप्प्यातील 2000 रुपये मातेच्या खात्यांवर जमा होतात.

Related posts: