|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » solapur » सुपारी देऊन वडिलानीच केला मुलाचा खून

सुपारी देऊन वडिलानीच केला मुलाचा खून 

प्रतिनिधी / सोलापूर

सतत मिळणारी अपमानास्पद वागणूक देणारा व शेतजमीन नावावर करुन दे म्हणून दमदाटी करणाऱया मुलाचा पित्यानेच सुपारी देऊन काटा काढल्याची घटना 29 जानेवारी रोजी घडली. अक्कलकोटहून पायी येणाऱया मुलाला दुचाकीवरुन नेऊन त्याचा खून करुन वळसंग पोलीस स्थानकाच्या हद्दीत मृतदेह टाकण्य़ात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा व वळसंग पोलिसांनी गुह्यातील पित्यासह चारही आरोपींना शुक्रावीर जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

शैलेश सुरेश घोडके (वय 31, रा.मार्डी ता.उ. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेश बेरोजगार होता. त्यातून त्याला दारुचे व्यसन होते. यामुळे आई-वडील तसेच नातेवाईक त्रासले होते. अनेकवर्षे मुलाकडून होणाऱया त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मुलाचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. वडील सुरेश घोडके याने आरोपी संजय उर्फ भोजू राठोड (वय28, रा. मुळेगाव हल्ली रा. आशानगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (वय47, रा. सेवालालनगर तांडा, ता.उ. सोलापूर), राहुल चंदू राठोड (वय28, रा. मुळेगाव तांडा, ता.द. सोलापूर) यांना गाठले. वडील सुरेश यांनी साधारण एक महिन्यापूर्वी मुलगा शैलेशच्या खुनाची सुपारी दिली होती.

यानंतर पित्यासह आरोपींनी शैलेशला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार 29 जानेवारी पूर्वी अक्कलकोट येथे गेलेल्या शैलेशला आरोपींनी बोलावून घेतले. तेथून त्याला दुसऱया ठिकाणी नेऊन त्याचा खून केला. खुनानंतर त्याला अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाच्या शिवारातील बिराजदार वस्ती परिसरात टाकून देण्यात आला होता.

 याप्रकरणी वळसंग पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा व वळसंग पोलीस ठाण्यातील पथकाने केलेल्या तपासात वडील सुरेश यानेच मारेकऱयांना सुपारी देऊन मुलगा शैलशचा खून केल्याचे उघड झाले असेही पाटील यांनी सांगेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष मानगावे, उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार खाज्या मुजावर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, मनोहर माने, पोलीस नाईक सुभाष शेंडगे, पोलीस कर्मचारी आसिफ शेख, आत्तार, सायबर पोलीस ठाणे, चालक पोलीस नाईक केशव पवार, वळसंग पोलीस ठाण्याचे शहानाज शेख, विकी माने, काळजे, थोरात व मियावाले यांनी केली.

Related posts: