|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिर निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण

अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिर निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण 

वृत्तसंस्था/ दुबई

संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहरात पहिले भव्य हिंदू मंदिर आकाराला येत असून ते पूर्णपणे भारतीय स्थापत्य शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार निर्मिण्यात येणार आहे. त्याची निर्मिती करत असताना लोखंड किंवा पोलादाचा उपयोग केला जाणार नाही, अशी घोषणा मंदिर व्यवस्थापनाने शुक्रवारी केली.

दोन वर्षापूर्वी या मंदिराच्या निर्मितीला अबुधाबी प्रशासनाने अनुमती दिली होती. त्यानंतर त्वरित मंदिराचे भूमीपूजन करण्यात येऊन कोनशिला स्थापन करण्यात आली. स्वामीनारायण संस्थेच्यावतीने या मंदिराचे निर्माण होत आहे.

गुरुवारी या मंदिराचा पायाभरणी समारंभ धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला. मंदिराची निर्मिती संपूर्णपणे सिमेंट काँक्रिटमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये फ्लायऍशचाही उपयोग केला जाईल. सर्वसाधारणतः अशा भव्य वास्तू निर्माण करत असताना लोखंड किंवा पोलादाच्या सळय़ांचा वापर अनिवार्य असतो. तथापि, हे मंदिर त्याला अपवाद ठरणार आहे.

मोदींच्या हस्ते कोनशिला

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराची कोनशिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दुबईतील नाटय़गृहातून स्थापन केली होती. संयुक्त अरब अमिरातीत 30 लाख भारतीय काम करीत असून त्यांनी अनेक दशकांपासून अशा भव्य मंदिराची मागणी केलेली आहे.

सजावटीची साधने भारतात

या मंदिराचे खांब, त्यातील विविध मूर्ती व पुतळे तसेच कोरीव काम इत्यादी सजावटीची साधने भारतात तयार करण्यात येत आहेत. तीन हजार हस्तव्यावसायिक कलाकार सध्या या कामात मग्न आहेत. यासाठी पाच हजार टन इटालियन संगमरवर उपयोगात आणण्यात येत आहे. मंदिराचे बाहय़ बांधकाम 12,500 टन वजनाच्या गुलाबी सँडस्टोनमध्ये करण्यात येईल.

स्थानिक प्रशासनाचे आभार

मंदिराच्या निर्मितीला अनुमती दिल्याबद्दल भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत पवन कपूर यांनी गुरुवारी एका प्रकट कार्यक्रमात अबुधाबी प्रशासनाचे आभार मानले. हे भव्य मंदिर अबुधाबीच्या समृद्ध संस्कृतीत आणखी मोलाची भर टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts: