|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 20 दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता

20 दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता 

पत्नी किंजल पटेल यांचा दावा : सरकारने लक्ष्य केल्याचा आरोप

वृत्तसंस्था / अहमदाबाद

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत. आपल्या पतीला गुजरात प्रशासनाने लक्ष्य केल्याचा आरोप हार्दिक यांची पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. ‘हार्दिक यांचा ठावठिकाणा आम्हाला माहित नाही, मात्र, त्यांच्या बेपत्ता असण्यामुळे आम्ही चिंतीत आहोत, असे किंजल यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. हार्दिक यांना देशद्रोहाच्या खटल्याप्रकरणी 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.

पाटीदार समाजाच्या आंदोलनातील नेत्यांवर लागू करण्यात आलेले सर्व खटले मागे घेण्यात येतील, असे सरकारने 2017 मध्ये सांगितले होते. मात्र, आता केवळ हार्दिक यांनाच जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. ज्या पाटीदार आंदोलनातील दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्या दोन नेत्यांची चौकशी का करण्यात येत नाही, असा प्रश्नही किंजल यांनी उपस्थित केला आहे. हार्दिक यांनी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणे बंद करावे, त्यांनी लोकांना भेटू नये, यासाठी सरकारकडून दबावतंत्र वापरण्यात येत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला.

दरम्यान, हार्दिक यांनी 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल समाज माध्यमावर अभिनंदन केले होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Related posts: