|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भोंदू काझीला साडेतीन वर्षाची कैद

भोंदू काझीला साडेतीन वर्षाची कैद 

अपत्यप्राप्ती करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

प्रतिनिधी/ गुहागर

एका कुटुंबाला अपत्य प्राप्ती करून देण्याचे व भुताटकी देण्याची ग्वाही देत  सव्वा लाख रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱया भोंदू मुश्ताक इसा काझी याला  गुहागर न्यायालयाने साडेतीन वर्षे साधी कैद व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

गुहागर तालुक्यातील पडवे रहिमत मोहल्ला येथे  6 ते 23 फेबुवारी 2014 या कालावधीत हा गुन्हा घडला होता. माझगाव मुस्लीम मोहल्ला येथील भोंदूबाबा आरोपी मुश्ताक इसा काझी याने पडवे रहिमत मोहल्ला येथील नाजिया अबिद तवसाळकर, कौसर मकबूल तवसाळकर यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीची मुलगी असमिना हिचा जुना आजार बरा करतो तसेच साक्षीदार महिलांना अपत्य प्राप्ती करून देतो असे सांगितले. तसेच फिर्यादीच्या मुलीला झपाटले असल्याचे सांगत तिच्यावर चाळीस दिवस अंमल करावा लागेल असे सांगितले. यावर उपाय करताना भोंदू काझी याने फिर्यादीच्या घरात जाऊन त्यांचे सोन्याचे दागिने मागून घेऊन ते ऍल्युमिनियमच्या टोपात ठेऊन दागिने असलेला टोप घरातील बेडखाली ठेवला. त्याचबरोबर फिर्यादीच्या घरात मडकी, नारळ, लिंबू, खारीक, काजू, बदाम, हळकुंड, आटीफणी, सुपारी, चवळी, हिरवा, काळा वाटाणा, काळे तीळ, तांदुळ, तावीज, गुलाब पाणी असलेल्या छोटय़ा बाटल्या, गुलाबी रंगाची पावडर, पांढरी पावडर आदी साहित्य मांडून घरात गुलाब पाणी शिंपडून घरातील लोकांना घराबाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने दोन ते तीनवेळा फिर्यादीच्या घरात येऊन वरीलप्रमाणे जादूटोण्याचे विधी रचून टोपात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, दोन अंगठय़ा, तीन कुडय़ा, दोन चेन, एक सोन्याची अंगठी असे दागिने चोरून नेले होते.

तसेच आरोपीने फिर्यादींना परदेशात मोठय़ा पगाराची नोकरी मिळवून देतो असे सांगून फिर्यादीचा पासपोर्ट घेऊन तो स्वतःच्या घरात नेऊन लपवून ठेवला होता. एवढेच नव्हे तर चोरलेले दागिने चिपळूण येथील सोनार मोहनलाल दर्गाजी ओसवाल यांना नेऊन विकले होते. याप्रकरणी आरोपी मुश्ताक इसा काझी याच्यावर फसवणूक, चोरी, जादूटोण्याचे अघोरी व समाजविघातक कृत्य केल्याने गुहागर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 406, 420, 380 व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013चे कलम 3(2) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हय़ाचा खटला गुहागर न्यायालयात सुरू होता. त्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी केला, तर पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ यांनी काम पाहिले. गुहागर न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा अंतिम निकाल देताना गुहागर पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यामुळे आरोपीवरील गुन्हा शाबीत झाला. त्याला 406 कलमासाठी 1 वर्ष साधा कारावास व 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास, 420 कलमासाठी 1 वर्ष साधा कारावास व 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास, 380 कलमासाठी 1 वर्ष साधा कारावास व 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा कलम 3(2)साठी 6 महिने साधा कारावास व 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास अशी एकूण तीन वर्षे 6 महिने साधी कैद व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Related posts: