|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » त्याग आणि कष्टाचा आदर्श आप्पासाहेबांनी उभा केला

त्याग आणि कष्टाचा आदर्श आप्पासाहेबांनी उभा केला 

प्रतिनिधी/ गोडोली

आप्पासाहेब पाटील यांनी संपूर्ण आयुष्य कष्टात गेले. कर्मवीर अण्णाचे चिरंजीव म्हणून जीवनातील भौतिक सुखे अनुभवायचे ठरविले असते तर संबंध महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता पण अण्णांनी दाखवलेली वाट चालायची आणि पोषक कामगिरी करायची ही भावना त्यांनी नेहमीच ठेवली. त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक जिह्यात रयतेचे कुटुंब उभे राहिले. रयतेचा वटवृक्ष पसरण्यासाठी आप्पासाहेबांचे योगदान मोठे असून त्याग आणि कष्टाने काम करण्याचा आदर्श आप्पासाहेबांनी उभा केला, असे भावोद्गार  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

  रयत शिक्षण संस्थेने नव्याने उभारलेल्या रयत सायन्स ऍड इनोव्हेशन अक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन आणि साताऱयात आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल नामकरण व नूतन इमारत उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील तर जेष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे यावेळी उपस्थित होते.

   रयत सायन्स ऍड इनोव्हेशन ऍकटीव्हीटी सेंटरचा संदर्भ देताना ते म्हणाले की “जग कुठे चाललेय हे ध्यानात घेऊन विज्ञानाच्या संबंधी आस्था वाढवण्याचा प्रयत्न रयत विज्ञान परिषदेने केला. रयतची विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून मला त्यांचा आत्मविश्वास महत्वाचा वाटतो. आज विज्ञानावर आधारित वातावरण समाजात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या पुढच्या काळात रयतच्या पंढरपूर, श्रीरामपूर, हडपसर या ठिकाणी देखील इनोव्हेशन सेंटर उभारून राज्याच्या अन्य जिह्यात देखील याचा विस्तार करता येईल.

 शरद पवार यांनी यावेळी बोलताना, “मी जगात विविध ठिकाणी फिरतो तेंव्हा चित्रपट, नाटक न पाहता शिक्षण व संशोधन संस्थाना भेटी देतो. तेथील संस्थात कोणते संशोधन चालते याविषयी माहिती घेत असतो. भारताच्या बाहेर कॉलेज, विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे बनू लागली आहेत. अमेरिका विद्यापीठात प्राध्यापक, विद्यार्थी हे आता संशोधनाचे काम अधिक करत असून त्यांना संशोधनाच्या लाभाचा वाटा घ्यायचा अधिकार देखील आहे. तशीच सुरुवात आता रयत शिक्षण संस्थेत केली आहे. यासाठीच डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर,डॉ. स्वाती मुजुमदार, बी. व्ही. झी. ग्रुपचे हनुमंत गायकवाड यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवरांना जनरल बॉडी सदस्य करून त्यांचा एक थिंक टॅक तयार केला.

  डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, “ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे ही कठीण गोष्ट असून मात्र रयत शिक्षण संस्थेने विज्ञानाचा दृष्टीकोन स्वीकारला आहे. नवीन गोष्ट शोधून काढायचे शिक्षण त्यांनी सुरु केले. भविष्यात ज्ञान युगात अनेक स्थित्यंतरे होणार असून शिक्षण येणाऱया काळाशी सुसंगत हवे. भारतीय राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूलभूत कर्तव्य आहे. भविष्यात व्हर्च्युअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अनेक क्षेत्रात परदेशी मंडळीवर अवलंबून न राहता या क्षेत्रात आपलीच माणसे तयार व्हावीत. तेच भारतियांच्या फायद्याचे असेल. ऍप्लिकेशन सतत बदलले तर आपल्याला पुन्हा पैसे मोजावे लागतात. म्हणून ऍप्लिकेशन भारतात तयार व्हावे. रयत विज्ञान कार्यक्रम, परिषदांसारख्या उपक्रमांची क्रांती देशात घडणे गरजेचे आहे. ही क्रांती लवकर व्हावी कारण जगात उपलब्ध संसाधने कमी होत चाललेली आहेत. रयत शिक्षण संस्था डोळसपणे हे काम करीत आहे, हे देशाला पथदर्शी आहे,’’ असे ते म्हणाले.

   डॉ. अनिल पाटील म्हणाले की, “1960 नंतर यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब नलावडे, आप्पासाहेब पाटील, मुल्लासाहेब हा रयत शिक्षण संस्थेचा सुवर्ण काळ होता. 1989 ते आजअखेर पवारसाहेब अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल, डिजिटल स्कूल, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या. दर तीन वर्षांनी आम्ही विज्ञान परिषदा भरवितो. रयत शिक्षण संस्थेतील 23 विद्यार्थी शिक्षकांनी पेटंटसाठी अर्ज केलेत. अटल टिंकरिंग लॅब 200 सुरु असून 40 कोटी रुपये उपयोगात आणले आहेत. इंग्रजी भाषा कौशल्ये पुढच्या काळात महत्वाची ठरणार आहेत. कौशल्य विकाससाठी संस्थेने आय. शी. आय. सी. आय, कुपर, लुपिन, या कंपनी बरोबर करार केलेले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविक सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले. आप्पासाहेब पाटील तैलचित्र रयत इंग्लिश मिडीयम स्कूल इमारतीचे उद्घाटन नामकरण शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते झाले. डॉ. विजय नलावडे लिखित ‘आप्पासाहेब’ या ग्रंथांचे, अरविंद गुप्ता यांच्या विज्ञान पुस्तिकेचे शरद पवार, डॉ. अनिल काकोडकर, इतर मान्यवरांचे हस्ते झाले.सौ.प्रतिभाताई पवार,कर्मवीर कुटुंबीय,नेहरू सायन्स सेंटर संचालक, डॉ. शिवप्रसाद खेणेद, होभी भाभा सेंटरचे नरेंद्र देशमुख, राजीव गांधी सायन्स सेंटरचे सल्लागार डॉ. अरुण सप्रे, रामशेठ ठाकूर, भगीरथ शिंदे, रवींद्र पवार, ऍड. दिलावर मुल्ला, माधवदादा मोहिते, डॉ.संजीव पाटील, प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी तर आभार प्राचार्य मेघा पवार यांनी मानले.

Related posts: