|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुरगाव पालिका मंडळाचे शिलकी अंदाजपत्रक संमत

मुरगाव पालिका मंडळाचे शिलकी अंदाजपत्रक संमत 

प्रतिनिधी/ वास्को

मुरगाव पालिका मंडळाने काल शुक्रवारी येत्या आर्थिक वर्षांसाठी शिलकी अंदाज पत्रक संमत केले. मात्र अंदाज पत्रक मांडण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीवर पालिका मंडळातील विरोधी सदस्यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे कोणत्याही आक्षेपाविना हे अंदाजपत्रक संमत झाले. या अंदाजपत्रकावरून विरोधी गट आणि नगराध्यक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

काल शुक्रवारी सकाळी मुरगाव पालिका सभागृहात वार्षिक अंदाजपत्रक मांडण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी हे अंदाज पत्रक बैठकीत चर्चेसाठी मांडले. बैठकीला सत्ताधारी गटाचे 14 सदस्य उपस्थित होते. मात्र, विरोधी गटाचा एकही सदस्य बैठकीला उपस्थित नव्हता. त्यामुळे विरोधी सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे स्पष्ट झाले. या बहिष्काराची कारणे विरोधी सदस्यांनी नंतर बैठकीबाहेर स्पष्ट केली. मात्र, यंदाचे शिलकी अंदाज पत्रक कोणत्याही आक्षेपाविना संमत झाले.

बहिष्काराबाबत नगराध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

विरोधी सदस्यांच्या अंदाज पत्रकाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याच्या कृतीबाबत मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत. विकास, सुधारणा आणि जनहिताचे उपक्रम या अंदाज पत्रकावर अवलंबून असतो. त्यामुळे नगरसेवकांनी अंदाज पत्रकावर आपले मते मांडण्यासाठी बैठकीला हजर राहणे आवश्यक होते. अंदाज पत्रकातील चर्चेत भाग घेऊन आपल्या सुचना व सुधारणा मांडणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी बैठकीवरच बहिष्कार घातल्याने या नगरसेवकांना जनहिताचे पडून गेलेले नसल्याचे दिसून येते असे नगराध्यक्षांनी म्हटले आहे.

फसव्या अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभागी होण्यात रस नव्हता

दरम्यान, विरोधी गटाचे सदस्य क्रितेश गावकर यांनी मुरारी बांदेकर, लियो रॉड्रिक्स, दामू कासकर, धनपाल स्वामी, लावीना डिसोजा, सारीका पालकर यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकावरील बैठकीवर बहिष्कार घालण्याच्या कृतीचे समर्थन केले. मुरगाव पालिकेच्या सत्ताधारी गटाने मांडलेले अंदाजपत्रक हे फसवे आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. या अंदाजपत्रकात पालिकेकडे आर्थिक ऐपत नसताना आकडे फुगवून दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळेच विरोधी गटाने या बैठकीवर बहिष्कार घातलेला आहे. आम्हाला अशा प्रकारच्या फसव्या अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभागी व्हायचे नव्हते असे क्रितेश गावकर यांनी स्पष्ट केले.

गावकर व त्यांच्या सहकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या तीन वर्षांत प्रत्येकी साडे चार कोटी, 1 कोटी 73 लाख व 1 कोटी 7 लाख रूपये वसुली झालेली असताना यंदा 10 कोटींची वसुली करण्याचे आश्वासन अंदाजपत्रकात दिलेले आहे. असा अंदाज किंवा अपेक्षा करणे साफ चुकीचे आहे. पालिकेला कामगारांचे वेतनही वेळेवर देणे शक्य होत नाही. त्यात कोटींचे शिलकी अंदाज पत्रक कसे शक्य आहे असा प्रश्न उपस्थित करून अशा अनेक त्रुटी या अंदाजपत्रकात असून पालिका मंडळातच सारा गोळ चाललेला आहे. अशा गोंधळात सहभागी होण्याचे स्वारस्य विरोधी गटाला नाही. पालिका मंडळात विरोधी गटाला न्याय मिळत नाही. कामे होत नाहीत, मजूर मिळत नाहीत. विकासकामे अडवली जातात. सुचना व तक्रारी मांडण्यासाठी पालिका मंडळाच्या सर्वसाधारण बैठका होत नाहीत. अंदाजपत्रकाच्या प्रतीसुध्दा बैठकीच्या केवळ तीन दिवस आधीच देण्यात आल्या. त्यामुळे विरोधकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासही वेळ देण्यात आलेला नाही. या साऱयाचा परीणाम पालिका क्षेत्रातील जनतेवर होत आहे. अंदाजपत्रक केवळ सत्ताधारी गटाच्या प्रभागांसाठीच मांडलेला असावा असाही आरोप क्रितेश गावकर व मुरारी बांदेकर यांनी केला.

राजकीय दबाव आणून अडवणुक करण्यातच विरोधी गटाला रस

नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी मात्र, विरोध गटाचे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी गटाला केवळ सत्ताधारी गटाची अडवणुक करण्यात जास्त स्वारस्य आहे. अन्यथा त्यांनी अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभागी होऊन पत्रकातील तरतुदींना आक्षेप घेतला असता. त्यांच्या आक्षेपांची उत्तरे देणेही आपल्याला शक्य झाले असते. पालिकेच्या वसुली मोहिमेतही विरोध गट आडकाठी आणतो. त्यासाठी बाहेरील राजकीय दबावही आणला जातो. नकारात्मक राजकारण खेळण्यापेक्षा विरोधी गटाने सकारात्मक सहकार्य केल्यास सर्व नगरसेवकांना विकासाची कामे वाटून देणेही शक्य आहे. विरोधी गटाने नकारात्मक राजकारण थांबवावे व पालिका क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्य करावे असा सल्ला नगराध्यक्षांनी दिला.

Related posts: