|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घनकचरा महामंडळाने सोनसडा प्रकल्पाचा ताबा घ्यावा

घनकचरा महामंडळाने सोनसडा प्रकल्पाचा ताबा घ्यावा 

प्रतिनिधी/ मडगाव

सोनसडा प्रकल्पाचा ताबा सोडण्याची तयारी दाखवून पालिकेने प्रकल्पाचा ताबा घ्यावा असे फोमेन्तो कंपनीने पत्र पाठविल्याने आणि तसे न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने आता घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने या प्रकल्प?ाचा ताबा घ्यावा अथवा यासंदर्भात काय करावे याविषयी सल्ला द्यावा अशा आशयाचा ठराव शुक्रवारी सकाळी बोलाविण्यात आलेल्या पालिका मंडळाच्या तातडीच्या खास बैठकीत घेण्यात आला.

यासंदर्भात आवश्यक कृती लगेच करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा पूजा नाईक रजेवर असल्याने प्रभारी नगराध्यक्ष टिटो कार्दोज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मुख्याधिकारी अजित पंचवाडकर, अन्य अधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत रूपेश महात्मे, दामोदर नाईक, अविनाश शिरोडकर, आर्थुर डिसिल्वा, डॉरीस टेक्सेरा, डॉ. बबिता प्रभुदेसाई यांनी आपली मते मांडली व वरीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला.

तो कचरा लँडफिल साइटच्या जागेत टाकणार

प्रकल्पाच्या आवारात 1 हजार टन ‘एक्सक्ल्युडेड’ कचरा पडून आहे. तो कचरा बाहेर काढल्याशिवाय नवीन कचऱयावर प्रक्रिया करणे शक्मय होणार नसल्याचे मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी नजरेस आणून दिले. यावर उपाय काढण्यासाठी  यार्डातील ’लँडफिल साईट’साठी आरक्षित जागेत सदर ‘एक्सक्ल्युडेड’ कचरा तात्पुरता टाकावा आणि नंतर तो काढून या कचऱयावर बायोरेमेडिएशन प्रक्रिया करावी, असा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पालिका अभियंता व नगरसेवक अशा एका प्रतिनिधी मंडळाला घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्याचे व सोनसडा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन महामंडळामार्फत हाताळण्यात यावा यासाठी त्यांना साकडे घालण्याचे ठरविण्यात आले. सोनसडा कचरा प्रकल्पासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आल्यास कित्येक वर्षे झाली आहेत. या समितीच्या वतीने कित्येक वेळा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले असल्याने यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाला प्रकल्प हाताळण्यास राजी करावे, अशी मागणी पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

लगेच आवश्यक कृती : कार्दोज

सरकार, घनकचरा व्यवस्थापन महामंडळ तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून सल्ला घेण्याचे पालिका मंडळाने ठरविले असून यासाठी लगेच आवश्यक कृती करण्याबरोबर प्रकल्पात साठलेला 1 हजार टन ‘एक्सक्ल्युडेड’ कचरा हटविण्यासाठी आजपासूनच काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष कार्दोज यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

सोनसडय़ावरून कंपनीला हटवू नये तसेच सोनसडा प्रकल्पात कचराही पाठविण्यात येऊ नये यासाठी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात केलेला अर्ज फोमेन्तो कंपनीने गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मागे घेतला होता. मडगाव पालिकेने 3 दिवसांत प्रकल्पाचा ताबा घ्यावा असे सूचित करण्यात आले असता पालिकेने ते शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर 7 दिवसांत प्रकल्पाचा ताबा घेण्यात यावा, असे न्या. बी. पी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते.

Related posts: