|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजापुरात इराणी गँग जेरबंद

विजापुरात इराणी गँग जेरबंद 

वार्ताहर/ विजापूर

सोनसोखळी चोरीप्रकरणी कुख्यात इराणी गँगला पकडण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. चोरीतील सोनसाखळी विक्रीसाठी जात असताना शुक्रवारी सोलापूर नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. चोरीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 150 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुलाम फरीद्दीन जाफरी उर्फ इराणी (वय 40, रा. बिदर), मोहम्मद इरफान उर्फ सलीम इराणी (वय 27, रा. सांगोला, सोलापूर), निसार अलियास पपट्टू चिनीबाबा इराणी (वय 42, रा. अकलूज, सोलापूर), मोहम्मद इनायत इराणी (वय 32, रा. अकलूज, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, गत अनेक महिन्यांपासून शहरात विविध ठिकाणी सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला होता. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख अनुपन अगरवाल यांनी एका पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने याआधी आंतरराज्य टोळीला अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, शुक्रवारी अटकेतील आरोपी दुचाकीने चोरीतील दागिने विकण्यासाठी सोलापूरला जात होते. त्यावेळी हे आरोपी सोलापूर नाक्याजवळ आले असता तेथे गस्तीवर असणाऱया पोलिसांना त्यांचा संशय असल्याने त्यांना थांबवून चौकशी केली. मात्र आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात नेण्यात आले. तेथे पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली.

यावेळी अतिरिक्त पोलीसप्रमुख डॉ. राम अरसिद्धी यांच्यासह पथकातील अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चौकट

पथकाला विशेष बक्षीस देणार

यावेळी पोलीसप्रमुख अनुपन अगरवाल म्हणाले, आरोपींपैकी गुलाम जाफीर इराणी व मोहम्मद सलीम इराणी यांच्यावर 2018 सालातील सात प्रकरणे दाखल आहेत. तसेच विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. कारवाईतील पथकाला विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: