|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्कॉतर्फे 8 हजार स्लिपिंग किटचे वितरण

स्कॉतर्फे 8 हजार स्लिपिंग किटचे वितरण 

प्रतिनिधी/ बेळगाव

देणाऱयांनी देत जावे,

घेणाऱयांनी घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱयाचे हात घ्यावे

याचे खऱया अर्थाने प्रत्यंत देत कॅनडाच्या स्लिपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड (स्कॉ) या संस्थेने यावषी अंदाजे 3 हजार रुपये किमतीचे 8 हजार स्लिपिंग किटचे वितरण बेळगाव आणि आसपासच्या गावांमध्ये केले आहे. गेली 49 वर्षे हा उपक्रम सुरू असून स्कॉचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने 1 हजार कीट अधिक देण्यात आले आहेत.

स्कॉ ही कॅनडा स्थित संस्था दरवषी 6 ते 12 वयोगटातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना दरवषी बेडकिट्सचे वितरण करते. मरे ड्रायडेन आणि मार्गारेट ड्रायडेन या दोघांनी थंडीने कुडकुडणाऱया बालकांना पाहिले आणि त्यांच्यासाठी उबदार पांघरुणांसह अन्य साहित्य वितरित करण्याचा उपक्रम सुरू झाला. यासाठी सदर संस्था कॅनडामध्ये निधी संकलन करते. जी व्यक्ती या उपक्रमासाठी निधी देते त्या व्यक्तीला पावती देण्यात येते. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या नावाने किट मिळतो त्यांचा फोटोही देणगीदाराला पाठविण्यात येतो.

दरवषी या उपक्रमासाठी रोटरी क्लब बेळगावशी समन्वय साधून स्कॉचे कार्यकर्ते  बेळगावला येतात. रोटरी क्लब बेळगावने 1988 पासून या उपक्रमाला सलग्न करून घेतले आहे. शुक्रवारी टिळकवाडी क्लब येथे सकाळी 8.30 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ झाला. स्कॉचे सॅन्डी, रिचिस क्लार्क, ज्युली कॉर्ने, मार्सेली ब्राऊमन, रॅफ सोडेल व फेट एम. एस. हे सकाळी 8 वाजताच टिळकवाडी क्लब येथे दाखल झाले. प्रत्येक विद्यार्थ्याची नेंदणी होऊन मुलांना नवीन शर्टपँट तर मुलींना नवीन फ्रॉक देण्यात आले. त्यानंतर सर्वच जणांना हे कीट वितरित करण्यात आले. यामध्ये चटई, मच्छरदाणी, चादर, ब्लॅंकेट, दप्तर, टॉवेल, रेनकोट व अन्य उपयुक्त साहित्य आहे.

यावषी बेळगाव जिल्हय़ाला पुराचा फटका बसला. याची नोंद घेऊन डंकन मॅग्रोवर यांनी 1 हजार जादा कीट पाठविल्या. बेळगावसह हुबळी, मुंदगोड, कुंदगोळ, रामदुर्ग, गोकाक, निपाणी, अथणी, जोयडा, अळणावर, बेळगाव, बैलहोंगल व कारवार या ठिकाणी रोटरीच्या साहाय्याने 8 हजार कीट वितरित करण्यात आले. बेळगाव विभागात मण्णूर, उचगाव, गोजगा, हंदिगनूर, कडोली, बेकिनकेरे, अतिवाड, बंबरगे, चलवेनहट्टी, जाफरवाडी या गावातील शालेय विद्यार्थ्यांना हे कीट देण्यात आले. मण्णूर येथील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम उघाडे यांनी या साहाय्याबद्दल सॅन्डी यांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. 

मुलांच्या चेहऱयावरील आनंद आम्हाला ऊर्जा देतो- सॅन्डी

या उपक्रमाबद्दल बोलताना स्कॉच्या सॅन्डी तरुण भारतशी बोलताना म्हणाल्या, स्कॉ दरवषी हा उपक्रम राबविते. भारतात आम्हाला हा उपक्रम राबविल्याचे आगळे समाधान लाभते. सर्व स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते अत्यंत सेवाभावी वृत्तीने व निःस्वार्थ भावनेने कार्य करतात. त्यामुळे हा सर्व उपक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जातो. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब व प्रामुख्याने दिलीप चिटणीस यांचे विशेष सहकार्य आम्हाला लाभते. मुलांच्या चेहऱयावरील आनंद आम्हाला ऊर्जा देतो. 

रोटरी क्लबचे कार्य पारदर्शक : दिलीप चिटणीस

रोटरी क्लब बेळगाव दरवषी हा उपक्रम राबविते. गेली कित्येक वर्षे स्कॉबरोबर हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. क्लबच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे स्कॉने बेळगाव हे हब्ब ठरविले आहे. शिवाय रोटरी क्लब बेळगाव ट्रस्टची सरकार दरबारी अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे विदेशी चलन व्यवहारात आणणे सुखर ठरते. क्लबच्या सर्व सदस्यांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरतो.

Related posts: