|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाभागातील मागासवर्गीयांना महाराष्ट्रात आरक्षण द्या

सीमाभागातील मागासवर्गीयांना महाराष्ट्रात आरक्षण द्या 

प्रतिनिधी/  निपाणी

महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील 865 गावांवर दावा सांगितला आहे. सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र तोपर्यंत सीमाभागातील मागासवर्गीय मराठी भाषिक विद्यार्थी, नोकरदारांचा जात पडताळणी दाखला ग्राह्य मानून त्यांना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी सीमाभाग मागासवर्गीय विद्यार्थी व नोकरदार कृती समितीच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.

पवार हे कोल्हापूर दौऱयावर आले असता प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोल्हापुरात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात, महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या सीमाभागातील 865 गावातील मराठी भाषिक मागासवर्गीय हे महाराष्ट्राच्या मागासवर्गीयांमध्ये मोडतात. त्यामुळे त्यांना खुल्या प्रवर्गात गणले जाऊ नये. यासाठी अनेक पुरावे असणारी कागदपत्रे सादर केली आहेत. पण अद्यापही योग्य तो अनुकूल निर्णय झालेला नाही. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेली असतानाही नियुक्तीपत्र देण्यासाठी संबंधित विभागात जातपडताळणी कारणास्तव सेवेत रुजू करून घेतले जात नाही. त्यामुळे अन्याय होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक सुनील कांबळे, प्रा. शरद कांबळे, प्रमोद कांबळे, सुनील शेवाळे, संजय कांबळे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Related posts: