|Saturday, March 28, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » ‘आई….आई..’

‘आई….आई..’ 

मालतीबाईंच्या निवासस्थानासमोर क्षणाक्षणाला लोकांची गर्दी वाढत होती. पोलीस बंदोबस्तही वाढत होता. दूरदर्शनवर ती सारी दृश्यं पुन्हा पुन्हा दाखवत होते. न्यूज पाहून तो अस्वस्थ झाला होता. आपण तिकडे जावं की जाऊ नये या विचाराने मन विचलीत झालं  होतं, पण लगेच त्याने लॅपटॉप उघडला आणि पहाटेच्या गाडीचं रिझर्व्हेशन केलं. रिझर्व्हेशनची पिंट काढून ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. त्याला काय करावं कळेना.

 

दूरदर्शनवर, ‘ब्रेकिंग न्यूज’ आली होती, ‘थोर समाज सेविका मालतीबाई माने यांचं दु:खद निधन!’ मृत्यूसमयी त्यांचं वय 69 वर्ष होतं. गेले दोन महिने त्या अंथरुणावरच होत्या. काल त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथेच त्यांचं निधन झालं. सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आणण्यात आला. त्यांच्या निधनाची वार्ता प्रसिद्ध होताच, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची त्यांचा अंत्यदर्शनासाठी तिकडे गर्दी झाली आहे.

अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी चार वाजता निघणार आहे.

मालतीबाईंनी ‘सामाजिक कार्यकर्त्या’ म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. झोपडपट्टी, महिला कष्टकऱयांच्या संघटना बांधल्या, आंदोलनं उभारली. अनाथ महिलाश्रमाच्या  त्या संस्थापिका होत्या. महिलांच्या सहकारी संस्था सुरू केल्या. ‘गोरगरीब कष्टकऱयांच्या कैवारी’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. काही काळ त्या राज्यसभेच्या सदस्याही राहिल्या होत्या. कॉमेड कामत यांच्याबरोबर तीस वर्षापूर्वी त्यांचा ‘प्रेम विवाह’ झाला.

विवाहानंतर कॉमेड कामतानी, सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. कामत पती-पत्नी अखेरपर्यंत कामगार चळवळीतच कार्यरत होते.

मालतीबाईंच्या निवासस्थानासमोर क्षणाक्षणाला लोकांची गर्दी वाढत होती. पोलीस बंदोबस्तही वाढत होता. दूरदर्शनवर ती सारी दृश्यं पुन्हा पुन्हा दाखवत होते.

न्यूज पाहून तो अस्वस्थ झाला होता. आपण तिकडे जावं की जाऊ नये या विचाराने मन विचलीत झालं  होतं, पण लगेच त्याने लॅपटॉप उघडला आणि पहाटेच्या गाडीचं रिझर्व्हेशन केलं. रिझर्व्हेशनची पिंट काढून ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिली. त्याला काय करावं कळेना.

त्याने ‘टीव्ही’ बंद केला आणि आत्याला फोन लावला,

‘हॅलो।़।़ आत्या, अग, आई गेली!’

‘हो, समजलं मला, तीच बातमी बघते आहे ‘टीव्ही’ वर मी!’

‘आपण जायचं का तिकडे?’ तो.

‘काहीही कारण नाही!’

‘पण!’

‘नाही, अजिबात जायचं नाही!’

‘अग, पण…’

‘आपला संबंध काय…?’

‘म्हणजे?’

‘आता कोणीही नाही ती आपली!’

‘पण…माझी आई…’

‘होती… आता नाही!’

‘अग, ‘पूर्वी होती, पण आता नाही’ असं कधी आईच्या बाबतीत असतं का?’

‘अरे, तिनेच सगळे संबंध तोडलेले आहेत…’

‘अगं,पण उद्या पहाटेच्या गाडीचं मी रिझर्व्हेशन करून टाकलं आहे.’

‘फेकून दे ते, अजिबात जायचं नाही- ’

‘पण, बरोबर दिसेल का हे?’

‘बापाचा काही अभिमान आहे का तुला?’

‘पण बाबा…’

‘अरे, तुझा बाबा गेला, तेव्हा साधा फोन तरी आला होता का तिचा?’

‘नाही.’

‘अरे, तिनेच तोडलेली आहेत, सारी नाती!’

‘पण आज तिच्याजवळ, तिचं असं कोणीच नाही-’

‘इकडे तुझा बाप गेला, आणि तिकडे तिने दुसरं लग्न केलं-’

‘पण…. तरी…’

‘कसलाही विचार करत बसू नको आता! अगदीच एकटं एकटं वाटत असेल घरांत, तर सरळ निघून ये  इकडे, माझ्याकडे.’

‘नको, मी ठीक आहे, इथे.’

त्याने फोन ठेवला.

बाबांना जाऊन पंधरा वर्ष होऊन गेली.

‘आई’ हाच बाबांचा असाध्य रोग होता.

दूरदर्शनवरच्या आईच्या फोटोवरून, आठवणीतल्या आईचं रुप तो शोधू लागला.

लहानपणी आठवतं, तेव्हापासून, आई क्वचितच घरात असायची. पहिल्यापासूनच तिचा सारा ओढा, बाहेर समाजकार्यात असायचा. मोर्चे, आंदोलन, सत्याग्रह, उपोषणं, संप, मेळावे, यातच ती व्यग्र असायची. एकदा आई निवडणुकीलाही उभी असल्याचं त्याला आठवतं, पण तेव्हा निवडणुकीत ती पडली होती. बाबांना तिचे उद्योग कधीच आवडत नसत. घरात आईबाबांमध्ये रोज वादविवाद आणि भांडणं होत असत.. आई दिवसभर बाहेरच असायची. म्हणून मग बाबांनी त्याच्या संगोपनासाठी  मोलकरणी सारखी एक बाई ठेवली होती. आईचं तिच्याशीही पटत नसे.

बाबांचा मात्र त्याच्यावर फार जीव होता. रात्री तो बाबांजवळच झोपायचा. रात्री कुशित घेऊन बाबा त्याला छान छान गोष्टी सांगायचे, रोज त्याचा अभ्यास घेत, शाळेत त्याला सोडायला जात. खूप छान छान खाऊ आणून देत. त्याचे फार लाड करीत. सुटीच्या दिवशी तलावावर पोहायला घेऊन जात. त्यानीच त्याला तिथे पोहायला शिकवलं. पाचवीत गेल्यावर त्याला नवीन सायकल घेऊन दिली. सायकल चालवायला शिकवली. कधी कधी बाबा त्याला सिनेमालाही घेऊन जात. बाबांबरोबर फिरायला जाताना तो खूप मजा करी. बाबा त्याच्यावर कधीही रागवत नसत. मोठय़ा सुट्टीत तो आत्याकडे रहायला जायचा, आत्याचाही तो फार लाडका होता.

पुढे बाबांनी त्याला वसतीगृहात ठेवला. तिथे ते त्याला नियमितपणे भेटायला येत. शाळेतील वसतीगृहातील शिक्षकांना भेटत, त्याची काळजी घ्यायला सांगत. त्याच्या अभ्यासाची चौकशी करत, पुस्तकं वहय़ा आणुन देत. येताना त्याला आवडणारा सारा सारा खाऊ आणून देत. आणि परत जाताना, खाऊसाठी आणखी पैसे देऊन जात. परत जाताना, बाबांचे पाण्यानी भरलेले डोळे, त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यापासून लपत नसत.

कॅपॉसमध्ये त्याचा आणि बाबांचा एकत्र काढलेला फोटो त्याने जपून ठेवला होता. बाबांची आठवण आली की कंपॉस उघडून तो बराच वेळ तो फोटो पहात बसे. आजही तो फोटो त्याने जपून ठेवला आहे. आई मात्र कधी शाळेत किंवा वसतीगृहात भेटायला आलेली त्याला आठवत नाही. ती सतत दूरदूरच असे. आईचं समाजकार्य, राजकारण, आंदोलनं, हे सतत वाढतच होतं. कॉ. कामतांबरोबरची  सलगी, मैत्री आता सुरू झाली होती. आंदोलनं, सभा, यातून आता ती दोघं एकत्रच असत. त्यांच्या आंदोलनाची व्याप्ती, आता निवडणुकीतील प्रचारसभांचे आईचेही दौरे राज्यभर चालू असत. कामत, त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. आईही त्यांच्या पक्षाच्या कार्यात, अग्रेसर होती. कामत निवडणुकांत पराभूत होत होते, परंतु जनमानसावर, कामत आणि पाठोपाठ आईचाही प्रभाव वाढत होता. समाजसेवेच्या मूलभूत कामांतून, लोकांच्या मनातील  त्यांच्याबद्दलचा आदर आणि विश्वास दृढमूल झालेला होता. सततच्या निवडणुकींतील पराभवानंतर, आता त्यानी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. अर्थांत आईही त्यांच्याबरोबरच होती. पण आईची मूलभुत प्रेरणा समाजसेवेची होती. त्यातच ती जास्त रमत होती. निराधार महिलाश्रमातील तिच्या तरुण महिलाही, आता तिच्या आंदोलनात उतरत होत्या, त्यामुळे आईच्या कामांची शक्ती वाढत होती. निराधार, दुर्बल, अशा त्या महिलांना, आता खंबीरपणे स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला होता. ग्रामीण भागातील महिलांसाठी, ‘सहकारी शेतीचा’ नवा अभिनव प्रयोग आता आईने सुरू केला होता. महिलांप्रमाणेच, अनाथ बालकांसाठी ‘बालकल्याण आश्रम’ सुरू करण्यासाठी महिलाश्रमातील तरुणींना आईनेच प्रेरणा दिली होती. आश्रमातील महिलांची प्रदर्शनं दूरदूर गावोगावी, शहरांतून सुरू झाली होती. समाजसेवेच्या या वाढत्या व्यापामुळे आता आईचा घराशी संपर्क कायमचा तुटला होता.

बाबा म्हणत, ‘जगातल्या बाहेरच्या माणसांची सेवा करण्यापेक्षा आधी आपल्या घरात लक्ष घाल! जनसेवेच्या वेडय़ा उमाळय़ापोटी, घरात आपल्या नवऱयाला, लहान मुलाला, तू, अनाथ, पोरकं, निराधार केलं आहेस!’

‘साऱया माध्यमांतून आईला मिळणाऱया प्रसिद्धीमुळे बाबांना आईबद्दल जेलसी वाटते.’ असं आई म्हणत असे.

बाबा चिडत, रागावत, चडफडत तडफडत होते.

समाजकार्यातील  आणि राजकारणातील, कामत आणि आईमधील जवळीक आता  जास्तच वाढत चालली होती. दोघांचं निवासस्थानही, आता एकच होतं. त्यांच्या संबंधांमली चर्चा आता होऊ लागली होती. वर्तमानपत्रांतून त्यांच्या प्रेमाच्या वार्ता आता वर्तवू जाऊ लागल्या होत्या. गॉसिप्स रंगू लागल्या होत्या. शाळेतली मुलं, त्यांच्याकडे, कधी चेष्टेने, तरं कधी सहानुभूतीने पाहू लागले होते. विनोदाने कॉमेंटस् होऊ लागल्या होत्या. तो घाबरुन गेला होता. एकदा वाटे, बाबांना हे सगळं सांगावं, पण त्याचं धाडस होत नव्हतं.

बाबा घरी एकटेच असत. ते आता सिग्रेट ओढू लागले होते. बघता बघता ते चेनस्मोकर झाले. घरात उदासवाणे बसून असत. संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर फिरायला जात असत.

मग काही दिवसांनी, आत्या त्यांच्या घरी येऊन राहिली. एक दिवस आत्या त्याला म्हणाली, ‘तुझा बाबा संध्याकाळी बाहेर  जातो, तेव्हा तू त्याच्याबरोबर जात जा, आणि तो कुठे जातो, काय काय करतो, कोणाकोणाला भेटतो, ते सारं घरी येऊन, मला सांगत जा.’

त्याने आत्याला विचारलं, ‘कां असं करायचं मी?’ त्याला काहीच कळेना.

आत्या म्हणाली, ‘बाबा घरी आला की, त्याच्या तोंडाला हल्ली कसला तरी वाईट उग्र वास येतो.’

‘कसला?’

‘तुला नाही कळायचं ते. तू फक्त मी सांगते तेवढं कर!’

तो गप्प बसला.

बाबा दारु पिऊ लागले आहेत, असा आत्याला संशय होता, आणि तेच खरं ठरलं. बाबा रोज रात्री, दारु पिऊन घरी येत, अंगणात एकटेच गप्पगप्प बसून असत.

तो घाबरुन गेला होता.

बाबांच्या काळजीने, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. घरीच बाबांच्याजवळ बसून रहाणं सुरक्षित वाटत नव्हतं.

नंतर पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरदेखील घरातलं भावविश्व बदललेलं नव्हतं.

आईचं घरात नसणं आता कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं.

एक दिवस बाबा म्हणाले, ‘तू कॉलेजला जात नाहीस, तर एखादी नोकरी तरी बघ! एकदा नोकरीला लागलास म्हणजे माझी काळजी मिटली! तू एकदा रांगेला लागलास, की मग मी मरायला मोकळा झालो!’

बाबा आता निर्वाणीचंच बोलत होते. पण शेवटी बाबांच्या आशीर्वादानेच, त्याला चांगली नोकरी लागली आणि तो इथे मुंबईत आला, तरीही अजून बाबांची काळजी त्याला चिकटलेलीच  होती. पण आता घरी बाबांची काळजी घ्यायला आत्या आली होती. आईचं घरी येणं आता बंदच झालं होतं.

एक दिवस रजिस्टर पत्राने आईचं पत्र आलं होतं. पत्राची सुरुवातच, ‘अप्रिय रघुनाथ-’ अशी केली होती आणि पत्राचा शेवट, ‘कधीच तुमची नसलेली’ असा होता.

तुमचं आणि माझं कधीच पटलं नाही आणि आयुष्यात पुढे कधीच पटणारही नाही, हे चिरंतन सत्य आहे. एस्टीच्या  गाडीत, एका सिटवर, काहीही संबंध नसलेली,दोन अनोळखी माणसं येऊन बसतात, तसं आपलं लग्न झालं. कायद्याने एकत्र आलो असलो, तरी मनाने कधीच नाही! आपल्या आवडी निवडी, आणि रंगही कधीच एकमेकांना पूरक नव्हते. मला प्रिय असलेल्या कोणत्याच गोष्टी, कधीच तुम्हाला आवडणाऱया नव्हत्या, आणि तुम्हाला आवडणाऱया कोणत्याच  गोष्टी मला कधीच प्रिय नव्हत्या. मला समाजसेवेची आवड, तर तुम्हाला त्याचा तिटकारा. मला गुलाबी रंग प्यारा, तर तुम्ही रंगहीन. मला (तुमची सोडून) सर्व लोकांची दु:खं निवारण करण्याची मनस्वी आवड, तर तुम्हाला, दुसऱयाकडून सेवा करून घेण्यात मनापासून आवड! तरीही अनिच्छेने, निसर्ग नियमानी मला तुमच्यापासून मुलगा झाला, पण तो एक शारीरिक अपघात होता. त्यातही मुलगा झाला, आणि तोही तुमच्यासारखा! विवाहाच्या त्या बेडय़ा मला सतत असहय़ होत राहिल्या आहेत. ती दुर्गंधी मला सहन करण्यापलिकडची आहे. लग्नाचा इतका गलिच्छ आशय, मला कधीच सहन न होणाराच आहे! म्हणून मला आता यातून मुक्ती हवी आहे, मला डिव्होर्स हवा आहे. सोबत ‘डिव्होर्स पेपर’ पाठवत आहे, तरी त्यावर सही करून, ताबडतोब मला परत पाठवून द्यावेत. व्यावहारिक आचरणातून आपण कधीच विलग झालो आहोत, आता हा व्यवहार कायदेशीर व्हावा! इतकंच!

पत्र वाचतानांच बाबा एकदम खाली कोसळले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्याला फोन आला, लगेच तो धावत आला.

दीड महिना बाबा हॉस्पिटलमध्ये होते. शेवटी त्यांना शेवटचा सिव्हिअर ऍटॅक आला आणि ते गेले. तिथेही आई कधी, त्यांना भेटायला गेली नाही, किंवा फोन करून साधी चौकशीही केली नाही. बाबा गेले, आणि आईचा डिव्होर्सचा प्रश्न सुटला. आईने कामतांबरोबर लग्न केलं. नंतर कामत गेल्याची बातमी त्याने पेपरमध्येच वाचली.

आज आई गेली. त्याला जाणवलं की अश्रूचा एकही थेंब आपल्या डोळय़ात अजून साचलेला नाही. त्रयस्थासारखा तटस्थपणे तो खुर्चीत बसून होता. पुन्हा त्याने टीव्ही ऑन केला. टीव्हीवर पुन्हा पुन्हा आईच्या मृत्यूची तीच तीच दृश्यं दाखवत होते. आता टीव्हीची निवेदिका, आईचं शेवटचं मृत्युपत्र वाचत होती, ‘माझे अंत्यसंस्कार कोणत्याही धार्मिक विधींनी करू नयेत.. कामत गेले तेव्हाच, खरं तर माझा मृत्यू झाला होता. आज केवळ औपचारिकता घडते आहे. माझे आता या जगात कोणी नाही. माझ्या महिलाश्रमाला मी माझे सर्वकाही अर्पण केले आहे. सर्वांना माझा अखेरचा नमस्कार!’

तटस्थपणे ‘टीव्ही’कडे पहात त्याने टीव्ही बंद केला. ड्राव्हर उघडला. सकाळच्या गाडीची ठेवलेली रिझर्व्हेशन्स फाडून, त्याचे बारीक बारीक तुकडे केले, आणि खिडकीतून बाहेर फेकून दिले.

वामन काळे

 

 

 

Related posts: