|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बादलीत डोके बुडवून केला अनिकेत कोथळेचा खून

बादलीत डोके बुडवून केला अनिकेत कोथळेचा खून 

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहर पोलीस ठाण्यात सहा नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे याचा खून पोलीस ठाण्याच्या सहाय्यक अधिकारी कक्षात करण्यात आला. हा खून करताना कोथळे याच्या डोक्याला डबल बुरखा घालण्यात आला होता. तसेच त्याचे हातपाय दोरीने बांधण्यात आले होते आणि त्याला उलटे टांगून पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून मारण्यात आल्याची साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलीस मारूती लोंढे यांनी जिल्हा व प्रधान न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर दिली.

कोथळे खूनप्रकरणांतील साक्षीदारांची तपासणी सोमवारी सुरू करण्यात आली. यामध्ये सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मारूती लोंढे यांची साक्ष न्यायालयात काढली. न्यायालयासमोर मारूती लोंढे यांनी साक्ष देताना संशयित आरोपी युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दिन मुल्ला, राहूल शिंगटे आणि झाकीर पट्टेवाले यांनी किती बेरहमीने आणि निष्ठूरपणे कोथळे याचा खून केल्याची सर्व हकीकत कथन केली. तसेच ही माहिती देत असताना त्यांनी या गुन्हय़ात वापरण्यात आलेल्या पाईप, प्लास्टिकची बादलीही न्यायालयासमोर ओळखली आहे.

सहा नोव्हेंबरचा 17 चा घटनाक्रमच न्यायालयात

मारूती लोंढे हे पीएसआय समीर चव्हाण यांचे रायटर म्हणून काम करत होते. सहा नोव्हेंबर 2017 रोजी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेळके हे अर्जित रजेवर होते. त्यामुळे या पोलीस ठाण्याचा कार्यभार चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. लोंढे हे त्यादिवशी दिवसभर कामावर होते. पोलीस ठाण्याच्या कोठडीत एकूण पाच आरोपी होते. त्यामध्ये कोथळे आणि अमोल भंडारे हे दोन नवीन आरोपी आले होते. या दोघांच्या गुन्हय़ाचा तपास पीएसआय कामटे यांच्याकडे होता. कामटे हे संध्याकाळी आले आणि त्यांनी या दोघांना कोठडीतून बाहेर काढले व त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यावेळी हे आरोपी आम्ही काही केले नाही, असे सांगत होते. दरम्यान, अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दिन मुल्ला, राहूल शिंगटे आणि झाकीर पट्टेवाले याठिकाणी आले. कामटे यांनी लाड यास दोरीने कोथळेचे हात बांधण्यास सांगितले. तसेच टोणे आणि मुल्ला यास पाय बांधण्यास सांगितले. कामटे यांनी दुसऱया बाजूला असलेल्या एका पोलीस नाईक यांच्याकडून त्यांनी दोन बुरखे मागून घेतले आणि एक बुरखा कोथळे याच्या डोक्यात घातला व त्यातून काय दिसते का हे तपासण्यासाठी त्यांनी प्लास्टिक पाईप त्याच्या डोळय़ासमोरून फिरविली. ती पाईप कोथळे यास दिसल्याने पुन्हा दुसरा बुरखा त्याला घातला. पुन्हा त्याच्या समोरून पाईप नेली. त्यावेळी कोथळे याने कोणतेही हालचाल केली नाही. त्यामुळे त्याला काहीही दिसत नाही हे लक्षात आले.

त्याला जोरदार मारहाण करण्यात आली. आणि यापूर्वी किती चोऱया तू केल्या आहेस, अशी विचारणा करण्यात आली. पण, त्याने मी ही एकच चोरी केल्याचे कबूल केले. पण, तरीही मारहाण होत होती.

उलटे करून छताला टांगले

कोथळे याचे हातपाय बांधले होते. त्याच दोरीने त्याला त्या केबीनच्या छताला उलटे करून बांधले. कामटेने एकाला पाण्याची बादली भरून घेवून आणण्यास सांगितले. पाण्याची बादली आणल्यानंतर उलटय़ा टांगलेल्या कोथळे याला त्यामध्ये दोन तिनदा बुडविले. कोथळे याने जोरदार हालचाल केली. पण, तरीसुध्दा हे त्याला बुडवत होते. तिसऱयावेळी कोथळे याने जोरदार हिसडा दिला आणि मला चक्कर येत असल्याचे सांगितले व तो धपकन खाली पडला. पण, त्यावेळी त्याचा बुरखा काढण्यात आला नाही. त्याला मारहाण सुरूच होती. पण, काहीवेळातच त्याची हालचाल थंड पडल्यानंतर त्याचा बुरखा काढण्यात आला. हा बुरखा काढल्यावर तो निपचिप पडल्याने त्याच्या छातीवर अनिल लाड यांनी हात लावला असता कोथळे याची धुकधुक सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कामटे यांनी त्याचा मित्र अमोल भंडारे याला कोथळे याच्या तोंडात फुंकण्यास सांगितले. पण, कोथळेची हालचाल काही वाढली नाही.

पीएसआय चव्हाण यांनी कोथळेला सिव्हीलला नेण्यास सांगितले

अनिकेत कोथळे खाली पडल्यानंतर जोराचा आवाज आला. त्यावेळी पीएसआय चव्हाण त्याठिकाणी पळत आले. त्यांनी संशयित कामटे याला याचा जाब विचारला. कोथळे याला तातडीने सिव्हीलमध्ये न्या, असे सांगितले. पण, कामटे यांनी चव्हाण यांना तुम्ही काही बोलू नका, आमचे आम्ही पाहतो, असे सांगितले. त्यानंतर कोथळे याच्या अंगावर कपडे घातले आणि त्याला बाहेर नेले. त्यानंतर काय झाले याची माहिती नसल्याचे लेंढे यांनी सांगितले.

कोथळे मारू नका म्हणून ओरडत होता

अनिकेत कोथळे याला या सहाजणांकडून जोरदार मारहाण करण्यात येत होती. त्यावेळी कोथळे हा मारू नका, मी खरे सांगतो, मी एकच चोरी केली आहे, असे सांगत होता. पण, या सहाजणांनी मात्र त्याचे ऐकले नाही, उलट त्याचे कपडे काढून हात-पाय बांधून त्याला उलटे टांगून त्याचे डोके बादलीत बुडवून मारले असल्याचे लोंढे यांनी न्यायालयात सांगितले.

चव्हाण यांनीही कामटे यांना मारहाण करू नका, असे सांगितले होते.

दरम्यान, या पोलीस ठाण्याचा चार्ज असणाऱया पीएसआय चव्हाण यांनीही कामटे यांना ही मारहाण तातडीने थांबवा, असे स्पष्ट सांगितले होते. पण, कामटे आणि त्यांच्या सहकाऱयांनी चव्हाण यांचे काहीही ऐकले नाही. उलट त्यांनी मारहाण वाढविली असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले.

Related posts: