|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गुढीपाडवा अडचणीत अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द

गुढीपाडवा अडचणीत अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द 

प्रतिनिधी/ पणजी

हिंदू धर्मियांच्या जिव्हाळय़ाचा व अत्यंत महत्त्वाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा कोरोना महामारीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्यात जनता कर्फ्यूचा कार्यकाल वाढविल्याने अडचणीत आला आहे.

 गुढीपाडव्याला हिंदू धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन या शुभदिनी अनेक नव्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी वा नूतन वास्तूमध्ये प्रवेश केला जातो. या व्यतिरिक्त राज्यात शिमगोत्सवाची समाप्ती असल्याने गावच्या मंदिरातील तरंगे, कळस, पालखी इत्यादी घरोघरी जाऊन भाविकांना कौल दिला जातो. राज्यातील प्रत्येक मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमही पारंपरिक पद्धतीने आयोजित केले जातात.

या दिनी हिंदूंच्या नववर्षाला प्रारंभ होत असतो. या पवित्र दिवशी प्रत्येक गावामध्ये पारंपरिक प्रथेने उत्सव साजरा केला जात असतो. मात्र सरकारने जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली. त्यातून या धार्मिक सणालादेखील बाजूला काढलेले नाही. परिणामी राज्यातील सर्वच हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र मंदिरांमध्ये पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होतील व हे कार्यक्रम जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

देशात पहिल्यांदाच भारताच्या उंबरठय़ावर अस्मानी संकट उभे ठाकल्याने त्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली आहेत. जनतेने देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याच्या उत्सवावरही संकटाचे काळे ढग साचलेले आहेत.

Related posts: