|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संचारबंदी मोडणाऱयांना दणका

संचारबंदी मोडणाऱयांना दणका 

कोरोना रोखण्यासाठी संचारबंदीचे पालन करा – के. मंजुलक्ष्मी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर सिंधुदुर्गात त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. सकाळच्या वेळी विनाकारण फिरणाऱया नागरिकांना पोलिसांनी फटकावल्यानंतर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. काही ठिकाणी पोलिसांनी दुकानेही बंद करायला लावली. शासकीय कार्यालयांमध्येही पाच टक्केच कर्मचारी उपस्थितीचे आदेश काढल्याने कार्यालयांमधूनही शुकशुकाट दिसत होता. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी जिल्हय़ातील सर्व नागरिकांनी संचारबंदीचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

 कोरोना विषाणूचा फैलाव भारतातही होऊ लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱया दिवशी सोमवारी नागरिक रस्त्यावर फिरताना दिसू लागले. जमावबंदी आदेश लागू करूनही नागरिकांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. सिंधुदुर्गात सोमवारी सायंकाळपासूनच पोलिसांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. संचारबंदी काळात गोवा, कर्नाटकसह जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी काढले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱया नागरिक, कर्मचाऱयांना सोडले जात आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र मंगळवारी सकाळच्यावेळी काही शहरामध्ये दुकाने उघडली व लोकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी ती तात्काळ बंद करायला लावली. तसेच काही नागरिक कारण नसताना फिरताना दिसत होते. त्यांना पोलिसांनी फटकावले. त्यानंतर जिल्हय़ातील बाजारपेठा आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.

महसूल प्रशासन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयांमध्ये पाच टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती होती. नागरिकही येणे बंद झाले आहेत. न्यायालये तर 31 मार्चपर्यंत बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात तालुकास्तरावर नोडल ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली आहेत. त्यांची नावे आणि नंबर पुढीलप्रमाणे आहेत. देवगड – डॉ. संतोष फोंडके (8007056401), कणकवली – डॉ. संजय पोळ (7769972078), मालवण – डॉ. कुबेर मिठारी (9423818738), वैभववाडी – डॉ. उमेश पाटील (9422964485), कुडाळ – डॉ. संदेश कांबळे (7020488793), दोडामार्ग – डॉ. रमेश कर्तस्कर (9423303471), वेंगुर्ले – डॉ. अश्विनी माईणकर (9422596661), सावंतवाडी – डॉ. वर्षा शिरोडकर (9284409093).

 कोरोनासंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास आपल्या तालुक्यातील अधिकाऱयांशी संपर्क साधा. घाबरून जाऊ नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कोरोना विषाणूचा फैलाव रोखणे आपल्या हाती आहे. योग्य माहिती आणि खबरदारी घेतली, तर आपण नक्कीच या संकटावर मात करू शकतो.

Related posts: