|Saturday, March 28, 2020
You are here: Home » क्रिडा » ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर

ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर 

जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे यांची माहिती, थॉमस बाक यांची अखेर प्रतिकूल परिस्थितीसमोर शरणागती

टोकियो / वृत्तसंस्था

जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचे जीवघेणे वादळ शमण्याचे नाव घेत नसताना टोकियो ऑलिम्पिकला देखील त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांना मंगळवारी जाहीर करावा लागला. जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर जपान व आयओसी यांनी संयुक्त पत्रक जारी करत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयवोसी) टोकियो ऑलिम्पिकबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीवरुन मंगळवारी अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चार आठवडय़ानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली होती. त्यावर जगभरातील ऍथलिटस्नी टीकेचे आसूड ओढले. यामुळे आयओसीला याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा लागला.

कॅनडा व ऑस्ट्रेलिया या संघांनी ऑलिम्पिकमधून माघार जाहीर केल्यानंतर अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा लांबणीवर टाकणे हाच सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असल्याचे नमूद केले होते. जागतिक स्तरावरील विविध ऑलिम्पिक संघटना व वर्ल्ड ऍथलेटिक्ससारख्या क्रीडा कार्यकारिणीनी ही स्पर्धा लांबणीवर टाकावी, अशी मागणी यापूर्वीपासूनच केली होती. मात्र, आयओसीने आतापर्यंत थांबा व पहा अशी भूमिका घेणे अधिक पसंत केले होते.

निर्णय घाईचा ठरेल

प्रत्यक्ष स्पर्धेला अद्याप जवळपास चार महिन्यांचा कालावधी हाताशी बाकी असल्याने आताच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे आयओसीने सोमवारी म्हटले. पण, 24 तासाचा कालावधी उलटण्यापूर्वीच त्यांना प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला. 

अमेरिकन पथकाचे सर्वेक्षण

अमेरिकन ऑलिम्पिक पथकाने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेबाबत सर्वेक्षण केले असून त्यात स्पर्धा लांबणीवर टाकावी का, असा प्रश्न 1780 अमेरिकन ऍथलिटसमोर ठेवला. त्यात 68 टक्के ऍथलिटस्नी ही स्पर्धा लांबणीवर टाकणे बेहत्तर ठरेल, असे नमूद केले होते. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या असून स्पर्धेच्या तयारीतही अडथळे आले आहेत.

काही देशांनी घरी थांबून राहण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर कमालीची बंधने आली आहेत. अमेरिकेच्या जलतरण व ट्रक अँड फिल्ड पथकाने आपल्या ऑलिम्पिक संघटनेशी यापूर्वीच संपर्क साधत स्पर्धा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

ब्रिटीश संघटनेकडूनही टीकास्त्र

दरम्यान, ब्रिटीश ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष हय़ूज रॉबर्टसन यांनी व्हायरसचा प्रकोप असाच कायम राहिला तर आपण आपले पथक पाठवू शकणार नाही, असे स्पष्ट केले होते. एकीकडे, स्पर्धेला विरोध कायम असताना गुरुवारपासून जपानमध्ये ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीच्या दौडीला सुरुवात होणे अपेक्षित होते. ते ही आता रद्दबातल झाले आहे. 

ब्रिटीश सायकलिस्ट कॅलम स्किनरने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यावर जोरदार टीका केली. बाक यांना कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करुन दाखवायची होती. पण, ते यासाठी खेळाडूंना पणाला लावत होते, अशी टीका कॅलमने केली. 

जपानचे पंतप्रधान, आयओसी अध्यक्ष यांच्यात सविस्तर चर्चा

जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. टोकियोचे राज्यपाल युरिको कोईके, आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी व ऑलिम्पिक मंत्री सेईको हाशिमोतो यांचाही या चर्चेत समावेश राहिला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चार आठवडय़ानंतर स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सोमवारी जाहीर केल्यानंतर त्यावर बरीच टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा फलद्रुप ठरली. कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांनी ऑलिम्पिकमधून यापूर्वीच माघार घेतली असून अमेरिकेने ही स्पर्धा लांबणीवर टाकणे योग्य ठरेल, असे म्हटले होते. 

जर्मन ऑलिम्पिक संघटना अध्यक्षांची आयओसीवर टीका

बर्लिन / वृत्तसंस्था

जर्मनीच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ऍल्फोन्स होएर्मन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर मंगळवारी कडाडून टीका केली. ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकणे गरजेचे आहे, असे ऍल्फोन्सनी नमूद केले होते. 

‘दि. 24 जुलैपासून स्पर्धा सुरु होणार आहे. त्याची पुनर्रचना करावीच लागणार आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती हा निर्णय लांबणीवर टाकत काय साध्य करत आहे, हे कोडेच आहे. जागतिक स्तरावरील खेळाडू, प्रशिक्षक, सहायक पथक व चाहते या सर्वांचे हित हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नजरेसमोर असायला हवे. पण, दुर्दैवाने तसे चित्र उशिरापर्यंत दिसून आले नाही’, अशी टीका त्यांनी पुढे बोलताना केली.

‘सध्याच्या परिस्थितीत आमचे खेळाडूही अतिशय कठीण परिस्थितीत, कठीण मानसिकतेत आहेत. जरी त्यांचा नियमित सराव सुरु असला तरी ऑलिम्पिक पात्रतेचा मार्गच अद्याप अनिश्चित असल्याने ही परिस्थिती आव्हानात्मक आहे’, असे त्यांनी शेवटी नमूद केले. 

स्पर्धा लांबणीवर टाकणे हाच अंतिम पर्याय ठरेल : डिक पाऊंड 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वरिष्ठ पदाधिकारी डिक पाऊंड यांनी अवघ्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप रोज संकटे, आव्हाने उभी करत असताना यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकणेच योग्य ठरेल, अशा शब्दात आपल्याच संघटनेला घरचा अहेर दिला. जपानचे पंतप्रधान ऍबे यांनी ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते बोलत होते.

 

 

Related posts: