|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोठय़ा शहरांमध्ये होणार दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग

मोठय़ा शहरांमध्ये होणार दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

हवामान बदल, वाढलेला पाऊस आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस उत्पादन अडचणीत असताना कोरोनाचे जागतिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आंबा एकदम बाजारात आल्यास दर पडण्याचा धोका आहे या पार्श्वभुमीवर माजी आमदार बाळ माने यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट एक व दोन डझन आंबा विक्रीचा प्रयोग होणार आहे.

बुधवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभकार्याचा प्रारंभ केला जातो. याच पार्श्वभुमीवर माने यांनी ही आंबा विक्रीची संकल्पना गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पत्रकारांसमोर मांडली. कोरोनाला रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. त्यानंतर ही योजना अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येईल. त्याकरिता मुंबईच्या नातेवाइक मंडळींनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या ठिकाणी राबवणार योजना

महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक आदी महापालिकांच्या क्षेत्रामध्ये एक व दोन डझन आंब्याची थेट विक्री करणे शक्य आहे.

नैसर्गिक पक्व आंबाच हवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात आंबा विक्रीमध्ये दर पाडण्याचा धोका संभवू शकतो. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी थेट विक्रीचा प्रयोग करणे शक्य आहे. त्यासाठी योजना आखण्यात येत आहे. थेट विक्रीसाठीची यंत्रणा उपलब्ध करण्यासाठीही मदत केली जाणार असून त्यासाठी इच्छुक शेतकऱयांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. बागायतदारांनी आंबा दोन किंवा एक डझन बॉक्समध्ये दिल्यास विक्रीसाठी सुकर होईल. तसेच रोख पैसे मिळतील, असे माने म्हणाले.

2 एप्रिलपासून सुरूवात

2 एप्रिल 2020 पासून उपक्रम सुरू होईल. यासाठी शेतकऱयांनी बागेतून काढलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवून रंग बदलला की द्यावा. म्हणजेच कोणत्याही केमिकलमधून पिकवून देऊ नये. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने आणि दादा केळकर यांच्याशी संपर्क साधावा. ही यंत्रणा विकसित करण्याकरिता बागायतदारांनी सूचना कराव्यात असेही माने यांनी सांगितले.

Related posts: