|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘गो कोरोना’ साठी गावकऱयांनीच रोखले रस्ते!

‘गो कोरोना’ साठी गावकऱयांनीच रोखले रस्ते! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी, राजापूर

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपययोजना सुरू असतानाच आता जागरूक गावकऱयांनीही स्वतःहून पुढे येत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. अनेक गावांनी बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदी केली आहे. चिपळुण तालुक्यातील परशुराम पाठोपाठ आता रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी, धनावडेवाडी, धामणसे, आंबेशेत त्याचबरोबर राजापुर तालुक्यातील पाचल व जैतापुर आदी गावांमध्ये गावकऱयांना रस्ते बंद करत स्वतःलाच ‘क्वारंटाईन’ करून घेतले आहे.

  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने संचार बंदी व सीमाबंदी लागू केली आहे. गावपातळीवर जोरदार जनजागृती मोहीम सुरू असून ग्रामसुरक्षा समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. गावात कुणी परगावाहून रहिवासी किंवा पाहुणे राहण्यासाठी आले असतील तर त्याची माहिती तात्काळ प्रशासन स्तरावर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थही सतर्क झाले आहेत.

  चिपळुण तालुक्यातील परशुराम गावाचा आदर्श घेत अनेक गावांनी आपल्या गावात कोरोनाचे संकट येऊ नये यासाठी खबरदारी घेत स्वतःहून आपल्याला क्वारंटाईन करण्यातचा निर्णय घेतला आहे. गावात ये-जा करणारे रस्तेच बंद करण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. मुंबईकरांना तर सोडाच पण आजूबाजूच्या लोकांनाही गावात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडीजवळच्या धनावडेवाडी येथे वाडीत जाणारा रस्ताच ग्रामस्थांनी बंद केला आहे. त्या रस्त्यावर बांबूचे कुंपण उभारण्यात येऊन सर्व वाहनांना अटकाव करण्यात आला आहे.

   त्या कुंपणाच्या ठिकाणीच वाडीत कुणीही बाहेर गावाहून येण्यापूर्वी ग्रामस्थांची परवानगी घ्यावी, असे बंधन घालण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी ये-जा करणाऱया लोकांना हात धुण्यासाठी डेटॉल व प्लास्टिक बॅरल पाणी भरून ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे अन्य गावातूनही खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्थ आता पुढे सरसावू लागले आहेत. तालुक्यातील धामणसे येथेही ग्रामस्थांनी रस्ता दगड व बांबूचे कुंपण करून गावाबाहेरील लोकांना येण्यास रोखले आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे मार्गे आंबेशेतकडे जाणारा मार्ग मोठे लाकडाचे ओंडके टाकून प्रतिबंधाचा सूचना फलक लावून बंद करण्यात आला आहे. पानवल गावाकडेही जाणारा रस्ता तेथील ग्रामस्थांनी पानवल फाटा येथे अडथळा करून रोखला आहे.

पाचल, जैतापूरने स्वतःला केले क्वारंटाईन      

राजापूर तालुक्यातील पाचल व जैतापूर गावानेही स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. दोन्ही गावांनी गावात जाणारे रस्ते बंद केले आहेत.

पुणे, मुंबईसह परदेशातून येणाऱयाकडून कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे या लोकांना गावातच येऊ न देण्याचा व आपल्या गावातील लोकांना बाहेर जाऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला आहे. पाचल ग्रामपंचायतीने गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बांबूचा अडथळा घालून बंद केले आहेत. गावाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून तेथे ग्रामस्थांनी खडा पहारा आहे. जैतापूर गावातही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावात जाणारा रस्ता अडवण्यात आला असून बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Related posts: