|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे काणकोणात खरेदीसाठी गर्दी

जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे काणकोणात खरेदीसाठी गर्दी 

प्रतिनिधी/ काणकोण

कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युमुळे जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा बऱयाच जणांना भासायला लागल्याने त्यात काही प्रमाणात शैथिल्य आणून मंगळवारी सकाळी 8 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणामालाची दुकाने, भाजी-मासळी मार्केट त्याचप्रमाणे दूधविक्री केंद्रे खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार काणकोणातील चावडी, पैंगीण, चार रस्ता येथील दुकाने उघडण्यात आली. मात्र माल खरेदी करताना गर्दी करू नका, रांगेत उभे राहा अशा सूचना करून देखील चावडीवर ग्राहकांनी एकच गर्दी केली.

त्यातील कित्येक जणांनी मास्कचा देखील वापर केला नव्हता. परदेशी नागरिक देखील खुलेपणाने वावरत होते. सकाळी 8 ते 11 पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची सूचना पोलिसांनी आदल्या दिवशी केली होती. पण मीच माझा रक्षक या तत्त्वाचा काही जणांनी अनादर केला, अशा शब्दांत चावडीवरील नागरिक शंकर नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर काणकोणच्या पोलिसांनी येऊन गर्दी पांगविण्याचे काम केले.

24 रोजी सकाळी दुधाच्या खरेदीसाठी बऱयाच जणांनी गर्दी केली. तब्बल तीन दिवसांनी चावडीवरील मासळी मार्केटमध्ये काही प्रमाणात मासळीविक्रेत्या महिला आल्या होत्या. त्या ठिकाणी देखील नागरिकांची झुंबड उडाली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी आणि गडबड न करता एक मीटर अंतराने उभे राहून खरेदी  करावी आणि 11 नंतर दुकाने बंद करावीत, अशा सूचना काणकोण पालिकेचे कर्मचारी करताना दिसत होते. पालिका मुख्याधिकारी प्रीतिदास गावकर यांनी त्यासाठी विशेष उपाययोजना केली होती.

दोन दिवसांनी वर्तमानपत्रांचे वितरण

तब्बल दोन दिवसांनी काणकोण तालुक्यात 24 रोजी वर्तमानपत्रांचे वितरण झाले. इलेक्ट्रॉनिक माध्यमापेक्षा छापील माध्यम प्रभावी आहे. दोन दिवस वर्तमानपत्रे चाळायला न मिळाल्यामुळे काही तरी चुकल्याचा अनुभव घेतला. दूरचित्रवाणीवर जरी घडामोडी बघायला मिळत असल्या, तरी त्याने समाधान झाले नव्हते, अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिक दिवाकर भगत, आर. बी. एस. कोमरपंत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रवासी वाहतूक बंद

24 रोजी देखील मडगाव-कारवार मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. काणकोणच्या अंतर्गत भागांमध्ये एकही खासगी किंवा कदंबची बस गेली नाही. पोळे चेकनाक्यावरून तपासणीशिवाय वाहनांना प्रवेश दिला जात नव्हता. कारवारहून येणारी मासेवाहतूक बंद पडल्यामुळे काणकोणातील खवय्यांची खूप गैरसोय झाली आहे.

श्री मल्लिकार्जुन मंदिर भाविकांना बंद

या पार्श्वभूमीवर श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर पुढील काही दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. 30 पर्यंत या मंदिरात पूजेच्या वेळी फक्त पुजारी, वेळीप आणि सेवेकरी यांचाच सहभाग असेल. या काळात मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार नाहीत याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

नववर्ष स्वागताचे कार्यक्रम रद्द

नववर्ष स्वागत समितीने 25 रोजी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालय पटांगणात आणि चावडीवरील गायतोंडे मैदानावर आयोजित केलेली सूर्याला ओवाळणी, पंचागवाचन, मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रत्येकाने आपल्या घरीच गुढी उभारावी. चावडीवरील मारूती मंदिराजवळ गुढी उभारण्याचा लहानसा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

जिन्याची जत्रा मर्यादित स्वरूपात

गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील इंद्रावाडा, सातोर्ली या भागांमध्ये गुढी पाडव्याच्या दिनी जिन्याची जत्रा हा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी जिन्याच्या काठय़ा, पाने, माडाची झावळे यांचा वापर करून तोरणे, तरंगे, तलवारी तयार केल्या जातात. सकाळी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून इंद्रावाडा येथील दोन्ही वाडय़ांवरील पुरुष मंडळी एकत्र जमून ढोल-ताशांच्या गजरात तरंगे नाचविली जातात. साधारणपणे 150 ते 200 लहान-ज्येष्ठ मंडळी या उत्सवात सहभागी होत असतात आणि त्यानंतर आपआपल्या घरी गोडधोड पदार्थांचा आस्वाद सर्व जण घेत असतात. यंदा कोरोनाच्या भीतीने या सर्व धार्मिक कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली आहे. शेतात जाऊन देवाजवळ पूजा करून सांगणी तेवढी केली जाईल. आपले रक्षण आपण स्वतःच करायला हवे. हे उत्सव पुढच्या वर्षी देखील करता येतील, असे सांगून वाडय़ावरील लोकांमध्ये जागृती करण्यात आल्याची माहिती इंद्रावाडा येथील वसंत पाडकर यांनी दिली. 

उपसभापती इजिदोरनी मानले जनतेचे आभार

कोरोना संसर्गामुळे अत्यंत वाईट परिस्थितीतून सध्या आपण मार्गक्रमण करत आहोत. काणकोण तालुक्यात 50 हजारांपेक्षा अधिक लोक राहतात. केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला काणकोणच्या नागरिकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल या मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने आपण त्यांचे आभार मानतो, असे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी म्हटले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत काणकोणवासियांची खूपच गैरसोय झाली. त्यामुळे 24 रोजी सकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही काळ मार्केट खुले ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला. त्याची कार्यवाही देखील झालेली आहे. काही दिवसांनंतर ही परिस्थिती आटोक्यात येणार आहे. मात्र या काळात काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, त्यांचे सहकारी, मामलेदार आणि अन्य कर्मचारी, आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण आणि पोलीस कर्मचारी, पालिका, सर्व पंचायतींचे सरपंच व अन्य काणकोणवासियांनी सामूहिकरीत्या परिस्थितीचा सामना केला. त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहोत, असे प्रसिद्धी पत्रकात फर्नांडिस यांनी नमूद केले आहे.

Related posts: