|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशासह आता गोवाही पूर्ण ‘लॉकडाऊन’

देशासह आता गोवाही पूर्ण ‘लॉकडाऊन’ 

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनाच्या गंभीरतेची दखल घेऊन सरकारने 31 मार्चपर्यंत गोवा 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडणाऱयांवर पोलीस कडक कारवाई करणार अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या आठ दिवसांत कुणीही बाहेरील राज्यातून आला असेल तर त्याची घरात माहिती दिली जावी किंवा घरात वेगळे ठेवावे. लोकांच्या मदतीसाठी 104, 100, 108 व 112 हे  क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून पूर्णपणे लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे त्य़ानंतर कुणीही घराबाहेर पडू नये. पोलीस कडक कारवाईचा अवलंब करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंपैकी काही महत्त्वाच्या वस्तूंचे वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र दोन दिवसांनंतर यावर निर्णय होणार आहे. त्यासाठी सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. आपण स्वतः या समितीचे नेतृत्व करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना व्हायरस प्रकरणात सर्वच आमदारांना विश्वासात घेतले आहे. गोवा डेअरीचे दूध उपलब्ध केले जाणार आहे. त्यांना सर्व सहकार्य दिले जाणार आहे. घरी वितरण करण्यासही हरकत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सतर्क रहा, काळजी घ्या

गोव्यात कोरोना व्हायरस नाही असा समज करून घेऊ नका. आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. कदाचित प्रतिकारशक्ती जास्त असल्याने बाधा झाली नसेल. मात्र आपली कळकळीची विनंती आहे सर्वांनी काळजी घ्यावी. मागील आठ दिवसांत एखादी व्यक्ती बाहेरील राज्यातून आली असेल तर त्याची माहिती 104 किंवा 108, 100 या क्रमांकावर द्यावी. आरोग्यखात्याची माणसे येऊन त्यांना घरीच वेगळे ठेवतील किंवा सरकारने तयार केलेल्या वेगळय़ा जागेत नेऊन ठेवतील. मात्र लोकांनी काळजी घ्यावी व असे काही असल्यास त्वरित माहिती द्यावी.

लोकांना वाचविण्यासाठी लॉकडाऊन

लोकांना वाचविण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती तिघांना बाधीत करते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारने ही काळजी घेऊन 31 मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये.

अत्यावश्यक त्यांनाचा कर्फ्यू पासेस

अत्यावश्यक आहे तिथे कर्फ्यू पासेस उपलब्ध केले जातील. पण गरज नसताना हे पासेस घेऊ नयेत. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांना असे पास उपलब्ध केले जातील. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्थाही केली जाणार आहे. लोकांनी अफवावर लक्ष ठेवू नये.

तिन्ही रुग्णांच्या स्थितीत सुधारणा

राज्यात कोरानाचे तीन संशयित रुग्ण होते. पण त्यांची स्थिती सुधारली असून त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही असे दिसून येते, असेही ते म्हणाले.

आरोग्य खात्याने अतिरिक्त व्हेंटिलेटर मागविले आहेत. रोजच्या ओपीडी बंद केल्या आहेत. कॅज्युअल्टी सुरू राहणार आहे. अपघात किंवा अन्य गंभीर आजारांसाठी इस्पितळात यावे. पण छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी इस्पितळात येऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

कोरोना निवारणासाठी अनेकांची मदत

गोवा स्टेट बँकेत ‘कोविड 19’साठी खाते खोलले आहे. सुवर्णा बांदेकर यांनी 15 लाख रुपये मदत दिली आहे. उद्योजक श्रीनिवास धेंपे, अगरवाल तसेच आयएएस अधिकारी यांनी मदत देण्याचे जाहीर केले आहे. ज्यांना मदत द्यायची असेल तर या खात्यावर मदत द्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्र्यांनी आपला एक महिन्याचा पगार दिलेला नाही. सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीला पूर्ण अधिकार दिले आहेत. मंत्रिमंडळाने या समितीला अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

31 मार्चपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यास सुरक्षितता वाढणार आहे. चेक नाक्यावर कडक तपासणी केली जात आहे. फार्मास्युटिकल्स कंपन्या चालू ठेवल्या आहेत. मात्र गोव्याबाहेरून कामगार आणू नयेत. त्यांची तपासणी व्हायला हवी. मुख्यमंत्री कार्यालयातही 12 जणांची टीम 24 तास कार्यरत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related posts: