|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लॉकडाऊनच्या प्रभावाने थांबले शहर

लॉकडाऊनच्या प्रभावाने थांबले शहर 

बेळगाव / प्रतिनिधी

राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या आदेशानंतर बेळगावमध्ये कठोर पाऊले उचलण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याचे दृष्टीस पडत आहे. कारणाशिवाय संचार करणाऱया नागरिकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. गुडीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत व्यवसायाची पर्वणी साधण्यासाठी आलेल्या विपेत्यांना मात्र पोलिसांनी हुसकावून लावले. त्यामुळे त्या छोटय़ा विपेत्यांनाही या लॉकडाऊनचा फटका बसला. ठिकठिकाणी करण्यात येणाऱया अडवणुकीमुळे वादंग निर्माण होत होते.

सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी नागरिकांना मंगळवारी घराबाहेर पडू नका, अशा सूचना केल्या होत्या. तरीही मंगळवारी पहाटेपासून नागरिक दुचाकी, चार चाकी घेऊन घराबाहेर पडत होते. वारंवार विनंती करूनही न ऐकणाऱया नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. ते पाहून इतर वाहनचालकांची पळता भुई थोडी झाली. सकाळी 8 पासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

मंगळवारी सकाळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विपेते गणपत गल्ली परिसरात दाखल झाले होते. परंतु या विपेत्यांना पोलिसांनी हटविले. लॉकडाऊन असताना तुम्ही साहित्याची विक्री का करताय, असा प्रश्न विचारण्यात येत होता. एसीपी चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विपेत्यांवर हा बडगा उगारला. त्यामुळे गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस रोड येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

ठिकठिकाणी कारवाईचा बडगा

शहरातील चन्नम्मा चौक, किल्ला, नेहरूनगर, आरपीडी चौक, क्लब रोड, अनगोळ नाका, गोवावेस, म. गांधी चौक या ठिकाणी नागरिकांची चौकशी केली जात होती. अत्यावश्यक सेवा देणाऱया नागरिकांना सोडले जात होते. परंतु विनाकारण संचार करणाऱया नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला.  लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळण्यासाठीच पोलिसांकडून ही कडक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची पूर्णपणे चौकशी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता.

सलग तिसऱया दिवशी बेळगाव शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. सकाळच्या सत्रात दूध विक्री व पेपर विक्री सुरू होती. बेळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्ये या लॉकडाऊनचा परिणाम जाणवला. अनगोळ, वडगाव, टिळकवाडी, नेहरूनगर, महांतेशनगर, शिवबसवनगर, गांधीनगर या भागामध्ये वर्दळ पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे रस्ते रिकामी दिसून येत होते. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक घरांमध्येच राहिल्याचे उपनगरांमध्ये दिसले.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री किरकोळ स्वरुपात

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या जात होत्या. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात होती.

पेट्रोल पंपांवर शुकशुकाट

एरवी पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या असायच्या. परंतु आता मात्र पेट्रोलपंपांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मध्यंतरी पेट्रोलची कमतरता भासेल अशा अफवा पसरविल्या जात असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होत होती. परंतु मंगळवारी मात्र पेट्रोल पंपांवर पूर्णपणे शुकशुकाट जाणवला.

सहकारी बँकांच्या कर्मचाऱयांची अडवणूक

गणेशपूर रोड, हिंडलगा येथून येणाऱया सहकारी बँकांच्या कर्मचाऱयांची पोलिसांनी अडवणूक केली. त्या कर्मचाऱयांना कामावर जाण्यापासून रोखून बडगा उगारण्यात आला. ओळखपत्र दाखवूनही कर्मचाऱयांवर बडगा उगारण्यात आल्याने त्यांना कामावर पोहचता आले नाही. त्यामुळे कर्मचारीवर्गातून पोलिसांबद्दल तीव्र संताप क्यक्त केला जात होता.

न्यू गांधीनगर येथे विपेत्यांना मारहाण

न्यू गांधीनगर येथील ब्रिजच्या शेजारी नेहमी फुलांचा बाजार भरतो. बुधवारी गुढीपाढवा असल्याने मंगळवारी पहाटे या बाजारात फुलांची विक्री करण्यास महिला व पुरुष दाखल झाले होते. परंतु पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत विपेत्या महिला व पुरुषांना मारहाण केली. विक्रीस आणलेली फुलेही फेकून देण्यात आली. यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी क्यक्त करण्यात येत होती.

 

Related posts: