|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्लेग निवारणासाठी इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरेंचे योगदान, मिरजेचे थोर संशोधक

प्लेग निवारणासाठी इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरेंचे योगदान, मिरजेचे थोर संशोधक 

मानसिंगराव कुमठेकर/मिरज

कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी देशभर प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून विविध विभाग आणि स्वयंसेवक झटताना दिसत आहेत. शंभर वर्षांपूर्वी अशाच प्रकारे आलेल्या महाभयंकर प्लेगमध्ये इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी प्लेग निर्मुलनासाठी मोठी कामगिरी केली होती. प्लेग सुपरिटेडन्ट म्हणून काम करताना त्यांनी घरोघर जावून निर्जंतुकीकरणासाठी प्रयत्न केले. त्यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे मिरजेतील प्लेग बळींची संख्या आटोक्यात आली. वासुदेवशास्त्री खरे यांनी प्लेगसंबंधी केलेल्या या कामगिरी संबंधातील काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांचे नांव महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात अग्रेसर आहे. ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी मराठेशाहीच्या उत्तरार्धाची अस्सल साधने प्रकाशित केली. आजही पेशवाईचा इतिहास लिहिण्यासाठी खरे शास्त्रींच्या ग्रंथांचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. वासुदेवशास्त्री खरे यांनी ऐतिहासिक लेख संग्रहाबरोबरच शिवसंभव, कृष्णकांचन, उग्रमंगल, देशकंटक यांसारखी गाजलेली नाटके लिहिली. यशवंतराव सारखे महाकाव्य लिहिले. थोर इतिहास संशोधक, प्रसिध्द नाटककाकर आणि व्युत्पन्न कवी म्हणून त्यांची ख्याती होती.

मिरज हायस्कुलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. 1898-99 दरम्यान, मिरज शहरात प्लेगची मोठी साथ आली. ही नियंत्रणात आणण्यासाठी तत्कालीन संस्थानिकांनी डॉ. विल्यम वॉन्लेस या ख्यातनाम धन्वंतरी बरोबर प्लेग सुपरिटेडन्ट म्हणून वासुदेवशास्त्री खरे यांची नेमणूक केली. या काळात खरे शास्त्रींनी केलेली कामगिरी ही अविस्मरणीय आहे. शास्त्रीबुवांनी घरोघर जावून नागरिकांना प्लेगपासून बचावाची माहिती दिली. त्यावेळी समाजात अनेक अंधश्रध्दा आणि औषधोपचाराविषयी तिरस्कार होता. *वासुदेवशास्त्री खरेंनी घरोघरी जावून लोकांच्या अंधश्रध्दा दूर करुन त्यांना औषधोपचार घेण्यास भाग पाडले. प्रत्येक घराचे निर्जंतुकीकरण कसे होईल, यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.

त्यांनी घर निर्जंतुकीकरण झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहीचे दाखले दिले होते. यापैकी काही दाखले मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. सलग वर्षभर त्यांनी मिरज आणि परिसरात फिरुन रुग्णांवर औषधोपचार, घरसफाई, क्वारंटाईनमध्ये रुग्ण पाठवणी अशी कामगिरी केली. त्यांनी केलेल्या अविश्रांत मेहनतीमुळे मिरज आणि परिसरात प्लेगने मोठा कहर मांडूनही बळींची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले. प्लेग निवारणासाठी नेमलेले अंमलदार म्हणून त्यांनी नागरिकांना कोणताही धाकधपटशा न दाखविता गोड बोलून, समजावून प्लेग निवारणासाठी काम केले. प्लेगमध्ये अनाथ झालेल्या मुलांची व्यवस्था पाहण्याचं काम खरे शास्त्रींनी पुढे काही वर्षे केले. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल संस्थानिक आणि ब्रिटीश सरकारनेही त्यांना गौरविले होते.

Related posts: