|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » कोरोना टेस्ट किटसच्या निर्मितीत कोल्हापुरच्या युवकाचे योगदान

कोरोना टेस्ट किटसच्या निर्मितीत कोल्हापुरच्या युवकाचे योगदान 

संजीव खाडे/कोल्हापूर

कोरोना विषाणू चाचणीसाठी पहिले भारतीय बनावटीचे अर्थात मेड इन इंडिया टेस्ट किटस केवळ सहा आठवड्यांच्या विक्रमी वेळेत तयार करण्याची कामगिरी पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्युशन्स या कंपनीने केली आहे. या कामगिरीत कोल्हापूरच्या रणजित देसाई या युवकाने ही मोलाचे योगदान दिले आहे.

रणजित देसाई हा तरुण गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापर गावचा आहे. रणजीत यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले. अकरावी आणि बारावी चे शिक्षण त्यांनी कोल्हापूरच्या मेन राजाराम हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. नंतर न्यू कॉलेजमधून बीएससी केमिस्ट्री पदवी घेतल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात बायोकेमिस्ट्री मध्ये एमएससी केले. रणजित यांनी कोरोना टेस्ट किड्स बनवण्याच्या अत्यंत जलद गतीने करण्यात आलेल्या प्रक्रियेत दिलेले योगदान कोल्हापूरवाशीयांसाठी अभिमानाचे गौरवाचे ठरले आहे

आपल्या देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोलुशन्स या कंपनीने काही दिवसांपूर्वी अतिशय महत्वपूर्ण पाऊले उचलत ही टेस्ट किट्स वेळेत तयार केली आहेत. या कंपनीच्या मोल्युक्युलर डायग्नोस्टिक विभागात रणजीत यांनी आपल्या टीम मधील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने टेस्ट किट बनवण्यात दिलेले योगदान सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

अडीच ते तीन तासात कुणाची चाचणी शक्य माय लॅब डिस्कवरी सोलुशन या कंपनीचा कारखाना लोणावळा येथे आहे. तर मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. या कंपनीत कोरोना च्या टेस्ट किट निर्मिती संदर्भात संशोधन सुरू झाले. त्यासाठी पंधरा जणांची टीम तयार करण्यात आली. या टीम मध्ये रणजीत देसाई यांचाही समावेश होता. सहा आठवड्याच्या म्हणजे दीड महिन्यांच्या कालावधीत कोरोना टेस्टचे किट तयार करण्यात देसाई आणि त्यांच्या टीमला यश आले. या कीटच्या माध्यमातून केवळ अडीच ते तीन तासांमध्ये कोरोनाची टेस्ट करणे शक्य होणार आहे. एका वेळेला 90 जणांची टेस्ट या किटच्या माध्यमातून होऊ शकते. कोरोना संशयिताच्या घशातील स्त्राव अर्थात स्वॉब घेऊन तो या किट च्या माध्यमातून तपासला जातो. त्याचे पृथक्करण केले जाते. कोरोनाचा विषाणू आढळल्यास हे किट त्यासंदर्भातील माहिती देते. सध्या या किटच्या माध्यमातून प्रयोगशाळेत तपासण्या सुरू आहेत. सरकारी दवाखाने आणि त्यातील प्रयोगशाळा तसेच सरकारच्या परवानगीने सुरू झालेल्या प्रयोग शाळांनाही किट पुरवले जात आहे. कमी वेळेत तपासणी करता येणार असल्याने रुग्णावर उपचार करणे सोपे आणि सुकर होणार आहे असे रणजित देसाई यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे कार्य करणाऱ्यांमध्ये रणजित देसाई यांच्या रूपाने कोल्हापूरचा तरुण असल्याचा अभिमान आहे. या कार्यामुळे कोरोना विरोधात जागतिक पातळीवर सुरू असलेल्या लढ्याला निश्‍चितपणे बळ मिळेल.
समरजीतसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष भाजप

Related posts: