|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » भाजीपाल्याचा ‘तळेगाव पॅटर्न’ पथदर्शक, राज्यभर राबविण्याची मागणी

भाजीपाल्याचा ‘तळेगाव पॅटर्न’ पथदर्शक, राज्यभर राबविण्याची मागणी 

ऑनलाईन टीम / तळेगाव :

संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून भाजी विक्री विलगीकरणाचा ’तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्याची मागणी होती आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे.

आमदार शेळके यांनी नुकतेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात कोरोना प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत शेळके यांनी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपरिषद व देहूरोड कँन्टोन्मेंटमधील सर्व मुख्यधिकारी व परिसरात सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी यांनी आपआपल्या भागात या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन शेळके यांनी केले.

शहरातील सर्व रस्ते व महत्त्वाच्या ठिकाणी औषध फवारणी करावी, प्रत्येक वॉर्डात भाजीपाला व फळविक्रीसाठी स्टॉल उभारावेत, घरपोच औषध सुविधा, घरपोच किराणा माल सुविधा उपलब्ध करून द्यावी व संचारबंदीच्या काळात पोलीस व शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्वयंसेवकांचे पथक नेमावे, असे महत्त्वाचे निर्णय बैठकीत झाले.

प्रथम औषध फवारणी करून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या नियोजनाखाली शहरात 13 ठिकाणी भाजीविक्री व फळविक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार भाजी विपेते व एक फळविपेता यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. भाजी व फळांबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एका स्टॉलसमोर एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्राहकांना भाज्या व फळे निवडून घेण्याची मुभा नाही. विपेत्यांना चढय़ा भावाने भाजी व फळे विकण्यास मनाई करण्यात आली आहे.

या प्रभागनिहाय भाजी विक्रीच्या उपक्रमाला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात कोठेही भाजी खरेदीसाठी गर्दी झाली नाही. कोरोना निर्मूलनासाठी निश्चित केलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल सर्व मुख्यधिकारी, सर्व पदाधिकारी आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी जाहीर आभार मानले.

 

Related posts: