आंध्रप्रदेश, तेलंगणात 60 हून अधिक ठिकाणी छापे
वृत्तसंस्था/ हैदराबाद
एनआयएने सोमवारी डावा उग्रवाद (एलडब्ल्यूई) म्हणजेच नक्षलवाद प्रकरणी आंध्रप्रदेश आणि तेलंगणात 60 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये संशयितांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. यंत्रणेला मिळालेल्या इनपूटच्या आधारावर एनआयएने राज्य पोलिसांसोबत मिळून ही कारवाई केली आहे.
नक्षलवाद किंवा डाव्या उग्रवादाप्रकरणी आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील 60 हून अधिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. तेलंगणातील हैदराबाद तर आंध्रप्रदेशातील गुंटूर, नेल्लोर आणि तिरुपति या जिल्ह्यांमध्ये एनआयएकडून शोध घेण्यात आला आहे. कथित स्वरुपात नागरी अधिकार समर्थकांच्या अनेक नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्व नेते नक्षलसमर्थक असल्याचा संशय आहे.
यापूर्वी मागील महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी देखील एनआयएने तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये छापे टाकले होते. ऑगस्ट महिन्यात हस्तगत झालेल्या स्फोटक सामग्री, ड्रोन आणि लेथ मशीन्सच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधित भारतीय कम्युनस्टि पार्टी (माओवादी)कडून या सामग्रीचा वापर सुरक्षा दलांच्या विरोधात करण्यात येणार होता असा आरोप आहे.
जून महिन्यात कोठागुडेमच्या चेरला येथे तीन आरोपींकडून स्फोटक सामग्री हस्तगत करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएने 12 आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदविले होते.