लोकसभा निवडणुकीत होणार युती : जागा वाटपाविषयी अद्याप निर्णय नाही
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात भाजप आणि निजदचा धुव्वा उडवून काँग्रेसने सत्ता काबीज केली. आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना निजदने केंद्रातील सत्ताधारी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असलेला निधर्मी जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला आहे. शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपासंबंधी चर्चा केली. पुन्हा उभय पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल.
दोन आठवड्यापूर्वी राज्य भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-निजद युतीचा निर्णय हायकमांडने घेतल्याचे उघड केले होते. तेव्हापासून भाजप आणि निजद युती अटकळ असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी निजद नेते कुमारस्वामी प्रतीक्षेत होते. मात्र, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसभेचे कामकाज उशिरापर्यंत चालल्याने ही भेट होऊ शकली नाही. तर याच दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुमारस्वामींशी युतीबाबत औपचारिक चर्चा केली. शुक्रवारी दुपारी कुमारस्वामींनी अमित शहा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जे. पी. नड्डा आणि प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते. यावेळी चर्चेनंतर अमित शहा यांनी निजदचे एनडीएमध्ये स्वागत असल्याचे सांगितले. हा एनडीए आणि पंतप्रधान मोदी यांच्या नवभारत, बलिष्ठ भारताचा दृष्टीकोन आणखी मजबूत करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एनडीएला आणखी बळकटी प्राप्त व्हावी, याकरिता निजद एनडीए गटात अधिकृतपणे सामील झाला आहे. याबद्दल निजद नेत्यांचे आपण अभिनंदन करीत आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाविषयी भाजपचे संसदीय मंडळ आणि निजद वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
भाजप-निजद युती का महत्त्वाची?
राज्यात सध्या काँग्रेसचे सरकार आहे. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे भाजपला सत्ता गमवावी लागली. भाजपला केवळ 66 जागा मिळाल्या. निजदला 19 जागांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने निजदशी युती करण्याची तयारी दर्शविली आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस, निजदला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. सुमलता अंबरिश या एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी निजद-भाजप युती अनिवार्य असल्याची जाणीव दोन्ही पक्षातील नेत्यांना झाली आहे.
जागा वाटपावर दसऱ्यानंतर निर्णय : कुमारस्वामी
अमित शहा यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, बैठकीत भाजप-निजद युतीविषयी चर्चा झाली आहे. राज्य भाजपचे नेतेही पुढील बैठकीत युतीच्या बैठकीत सहभागी होतील. जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोणाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचे नाही. राज्यात भाजप-निजद युतीला लोकसभेच्या सर्व जागा मिळणे हेच उद्दिष्ट आहे. चांगला दिवस, योग्य दिवस पासून कोणाला किती मतदारसंघ सोडून द्यावेत, यावर दसऱ्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कुमारस्वामी यांनी दिली. कर्नाटकात नवे राजकीय पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने निधर्मी जनता दल एनडीए गटात सामिल होण्यासंबंधी भाजपश्रेष्ठींशी महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले.