वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या आणि भारतीय वंशाच्या निक्की हेली या 2024 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. रिबब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान देणार आहेत अशी माहिती त्यांच्या गटातील नेत्यांकडून देण्यात आली आहे.
निक्की हेली या अमृतसरमधून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या अजितसिंग रंधावा आणि राज कौर या दांपत्याच्या कन्या आहेत. त्या पंजाबी शीख समाजातील आहेत. त्यांचे पिता पूर्वी पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब अमेरिकेला जाऊन तिथे स्थायीक झाले होते. त्यांच्या पित्याने काहीकाळ कॅनडातही वास्तव्य केले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. हेली यांच्या माता दिल्ली विद्यापीठाच्या कायदा पदवीधर आहेत.
नवे नेतृत्च आवश्यक
अमेरिकेला आता नव्या आणि तुलनेने तरुण रक्ताच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. यासाठी आपण अध्यक्षदाच्या स्पर्धेत उतरण्यास सज्ज आहोत. त्या 51 वर्षांच्या आहेत. त्या आपल्या प्रचाराची रुपरेषा उद्या गुरुवारच्या जाहीर सभेत स्पष्ट करणार आहेत. ही सभा दक्षिण कॅरोलिनातील चार्ल्सटन येथे होणार आहे.
अमेरिकेतील पद्धती
अमेरिकेत कोणत्याही निवडणुकीत उमेदवारची निवड पक्षश्रेष्ठी करत नाहीत. ही निवड लोकांमधूनच केली जाते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांचा उमेदवार कोण असावा, याचा निर्णय जनतेचा कौल आजमावून घेतला जातो. अनेक स्तरांमध्ये निवडणुका घेत अंतिमतः उमेरवाराची निवड होते. त्यामुळे निक्की हेली यांना प्रथम रिपब्लिकन पक्षातील त्यांच्या स्पर्धकांना मात द्यावी लागणार आहे.