ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारे माजी खासदार निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशी ऑफर नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी दिली आहे.
निवडणुका जवळ आल्या की शरद पवार यांना मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार असे वादग्रस्त ट्विट निलेश राणे यांनी केले होते. या ट्विटमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेटून उठले असून, राज्यभरातून राणे पिता-पुत्रांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाच नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी नीलेश राणे यांच्या कानाखाली वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशी ऑफर दिली आहे.
संभाजीनगर, कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये जातीय दंगली उफाळून आल्या. राज्यात शांतता व सलोखा कसा कायम राहील ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र, राणे यात तेल ओतण्याचे काम करीत आहे. आमच्या वरिष्ठ नेत्याचा अपमान सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.