वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळमध्ये निपा या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव सुरुच आहे. शुक्रवारी आणखी एका रुग्णाची नोंद झाल्याने राज्य सरकारने दक्षतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत एकंदर 900 जणांची संपर्क सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा आजार मेंदूवर विपरीत परिणाम करत असल्याने तो अधिक धोकादायक आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य विषयक नियमांचे पालन केल्यास या आजारापासून दूर राहता येते, असेही तज्ञांनी स्पष्ट केले.
केरळ शेजारच्या कर्नाटक राज्याला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचा इशारा दिला आहे. राजस्थान सरकारला सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत या दोन राज्यांमध्ये या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळलेले नसले तरी बेसावधपणा दाखवू नका अशी सूचना केंद्र सरकारने केली.
राज्यमंत्र्यांची भेट
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी 14 सप्टेंबरला पुणे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ आणि राष्ट्रीय व्हायरॉलॉजी संस्थेला भेट दिली. त्यांनी निपाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली आणि काही सूचनाही केल्या.
कर्नाटक सरकारची सूचना
कर्नाटक सरकारने राज्यातील नागरीकांना केरळच्या निपा प्रभावित भागाला भेट देऊ नका, अशी सूचना केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच पूर्ण दक्षता घेऊन या भागात जावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरीकांना दक्षतेचे उपाय करण्याची सूचनाही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
निपा होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता
ड निपा आजार वटवाघुळांपासून माणसाला होतो. त्यामुळे वटवाघुळांचा स्पर्श झालेली फळे, खजूर, पाम सॅप, जमिनीवर उगविणारी फळे इत्यादी खाऊ नयेत.
ड या आजाराची लागण झालेल्या जनावरांपासून दूर रहावे. हा आजार डुकरे किंवा इतर पाळीव प्राण्यांना होऊ शकतो. त्यांचा संपर्क टाळणे लाभदायक आहे.
ड या आजाराची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात येऊ नये. त्याचे रक्त, थुंकी, मलमूत्र आदींचा स्पर्श टाळणे आवश्यक आहे. रुग्णांचे विलगीकरण करावे.
ड हात सातत्याने साबण किंवा सॅनिटायझरने धुवा. स्वच्छतेचे नियम पाळा. शक्यतो प्रभावित भागांचा प्रवास टाळा. अनोळखी स्थानी जाणे टाळणे लाभदायक.
ड डुकरांच्या संपर्कात आलेले खाण्याचे पदार्थ टाळणे आवश्यक. खाण्यापिण्याच्या संदर्भात शक्य ती सर्व दक्षता घेणे हा आजार टाळण्यासाठी अतिआवश्यक आहे.
या आजाराची लक्षणे
- सतत ताप, 2. चक्कर येणे, 3. अशक्तपणा जाणवणे, 4. स्नायूदुखी, 5. जुलाब किंवा हगवण ही लक्षणे या आजाराची आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास मेंदूज्वर होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हा आजार बालांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक आहे.
विशेष समिती नियुक्त
केंद्र सरकारनेही निपाचा प्रादुर्भाव गांभीर्याने घेतला असून डॉ. माला छाब्रा यांच्या नेतृत्वात एका विशेष समितीची स्थापना केली आहे. ही समिती राज्यांना निपा थोपविण्यासाठी साहाय्य आणि सहकार्य करणार आहे. केंद्र सरकारच्या उच्च पातळीवरच्या एका पथकाने कोझिकोडे येथे भेट दिली आहे. हे पथक बीएसएल-3 या पातळीवर काम करणाऱ्या प्रयोगशाळेचे आहे. कोझिकोडे येथे वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘ऑन ग्राऊंड टेस्टिंग’ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
उपचारांची उपलब्धता
निपा हा आजार घातक असला तरी तो उपचारहीन नाही. त्याच्यावर उपचार करण्यासाठी ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ची आवश्यकता असते. केंद्र सरकारने केरळ सरकारसाठी ही उपलब्धता केलेली आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. केरळ सरकारने केंद्र सरकारला ही विनंती केली होती. ती केंद्र सरकारने त्वरित कृती करुन पूर्ण केली असे स्पष्ट करण्यात आले.