वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याच्या उद्देशाने इंडिया या नावाने एकत्र आलेल्या 28 पक्षांच्या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. परंतु याच्या संयोजकाच्या नावावर अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. याचदरम्यान लोकजनशक्ती (रामविलास) पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोठा दावा करत विरोधी पक्षांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भरवसा नसल्याचे वक्तव्य केले आहे.
विरोधी पक्षांमध्ये नितीश कुमार यांच्यावरून संभ्रम आहे. याचमुळे ते स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यास कधीही आघाडी सोडू शकतात. राज्यातील त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याकडूनच नितीश कुमार यांना समर्थन मिळत नसल्याचे चित्र आहे असा दावा पासवान यांनी केला आहे.
पूर्वी लालूप्रसाद यादव यांचे राज्यात सरकार असताना नितीश कुमार हे बिहारमध्ये जंगलराज असल्याचा आरोप करायचे. बिहारमध्ये दोन्ही नेते परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले असायचे. परंतु आता ते केवळ सत्तेपोटी एकत्र आले आहेत. राजद-संजद आघाडी विरोधाभासाने युक्त आहे. नितीश कुमार यांच्या विश्वसनीयतेवर संशय असल्यानेच त्यांना संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आलेली नसल्याचा दावा पासवान यांनी केला आहे.