कुमारी श्रीमती ही वेबसीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तमिळ, तेलगू, मल्याळी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. ही विनोदी धाटणीची सीरिज असून यात नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहे. 7 एपिसोड्स असणारी ही सीरिज 28 सप्टेंबरपासून स्ट्रीम करण्यात येणार आहे. सीरिजमध्ये नित्यासोबत निरुपम, गौतमी, थिरुवीर, तल्लुरी रामेश्वरी, नरेश आणि मुरली मोहन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
या सीरिजची निर्मिती वैजयंती एंटरटेन्मेंट्स आणि अर्ली मान्सून टेल्सकडून करण्यात आली आहे. तर दिग्दर्शन गोमटेश उपाध्याय यांनी केले आहे. श्रीमतीची कहाणी दृढनिश्चय, जिद्द आणि परिवाराचे अतूट बंधन दर्शविणारी आहे. ही सीरिज घरगुती जीवनासोबत समाजाच्या बंधनांना तोडण्याची आणि स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्याची धडपड दर्शविणारी आहे. प्रेक्षक याच्या सर्व व्यक्तिरेखांना स्वत:शी जोडू शकणार आहेत असा दावा निर्मात्या स्वप्ना दत्त यांनी केला आहे. कुमारी श्रीमतीची कहाणी पूर्व गोदावरीच्या एका गावामधील दाखविण्यात आली आहे. यात नित्या मेनन एका तीस वर्षीय महिलेची भूमिका साकारत आहे. स्वत:च्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकून पडलेल्या परंतु गावातील रुढीवादी मानसिकतेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या महिलेची ही कहाणी आहे. नित्या मेनन ही दक्षिणेतील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे. मिशन मंगल या हिंदी चित्रपटात ती दिसून आली होती.