काँग्रेस पुरस्कृत इंडिया या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गेले काही दिवस मणिपूर राज्यात चाललेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर इंडिया या आघाडीने मोदी सरकारवर सातत्याने आरोप करून ते मणिपूरमध्ये सरकर पुर्ण अपयशी आणि निष्क्रिय ठरल्याचा आरोप केला आहे. तसेच इथे संख्याबळाचा मुद्दा नसून मणिपूरच्या न्यायाचा मुद्दा आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीचा नाईलाज झाल्यानेच मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
पहिल्यांदा नुकतेच आपली खासदारकी परत मिळवलेले काँग्रेस नेते राहूल गांधी अविश्वास ठराव मांडणीच्या सुरवातीला बोलतील असे सांगितले असतानाच अचानक खासदार गौरव गौगई यांनी ठरावाला बोलण्याची सुरवात केली. त्याला भाजपच्या खासदारी आक्षेप घेतला. बऱ्याच गोंधळानंतर सभापतींनी खासदार गोगोई यांना बोलण्याची परवानगी दिली.
खासदार गौरव गोगोई आपल्या भाषणाच्या सुरुवातीला संसदेत बोलताना ते म्हणाले, “इंडिया अलायन्सचा अविश्वास प्रस्तावाला संपुर्ण पाठिंबा असून आमचा नाईलाज झाल्यामुळेच आम्हाला हा अविश्वास प्रस्ताव संसदेत आणावा लागला. इथे मुद्दा संसदेतील आमच्या संख्याबळाचा नसून मणिपूरसाठीच्या हक्कासाठी तसेच न्यायासाठीचा मुद्दा आहे. मणिपूरचा तरुण वर्ग, मुली, शेतकरी, विद्यार्थी न्याय मागत असल्यानेच इंडिया आघाडीनं मणिपूरच्या भवितव्यासाठीच हा प्रस्ताव आणला आहे.”असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसकडून सातत्याने मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौनव्रत धारण केल्याची टीका करताना “आमची मागणी स्पष्ट आहे कि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे प्रमुख या नात्याने सभागृहात येऊन आपली भूमिका मांडावी. तसेच मणिपूरला संदेश द्यावा की हे संपुर्ण देश अशा कठीण प्रसंगी मणिपूरसोबत आहे. पण दुर्दैवाने असं होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केलं असून ते ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार आहेत. त्यामुळेच इंडीया आघाडीने हा अविश्वास ठराव आणला असून पंतप्रधानांचे मौनव्रत आम्हाला तोडायचं आहे” अशा शब्दात गौरव गोगोई यांनी आपली भुमिका मांडली.