जनजीवन पूर्वपदावर : बाजारपेठेत नागरिकांचीही गर्दी, शेतीकामांना मिळाली गती : अनेकांतून समाधान
बेळगाव : मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर शुक्रवारी मात्र पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. दिवसभर उन-पावसाचा लपंडाव सुरू होता. पाऊस कमी झाल्यामुळे शहरात काही ठिकाणी तुंबलेले पाणी कमी झाले. याचबरोबर उपनगरातील रस्त्यावरील पाणीही कमी झाले असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आठ दिवसांमध्ये पावसाला दमदार सुऊवात झाली होती. गुऊवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून तारांबळ उडाली होती. यामुळे जनता तणावाखाली होती. पाऊस कमी होणार की नाही? याची भीती लागली होती. मात्र गुऊवारी सायंकाळपासून पावसाचा वेग कमी झाला होता. याचबरोबर शुक्रवारी तर सूर्याचे दर्शन झाले. यामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला. पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. तर उर्वरित कामे करण्यासाठी शेतकरीही धडपड करणार आहेत. दमदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. बळ्ळारी नाला तर पाण्याखाली गेला आहे. या नाल्याच्या परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे भात पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आता पावसाने विश्र्रांती घेतली तरच या पिकांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार असून आणखी काही दिवस पावसाने उघडीप द्यावी, अशी मागणी होत आहे. यावषी मान्सून उशिराने दाखल झाला. यामुळे पाऊस होईल की नाही, याची भीती साऱ्यांनाच लागली होती. मान्सूनचे आगमन झाले तर पावसाचे प्रमाण कमीच होते. सुऊवातीला दोन दिवस पाऊस पडल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली होती. त्यानंतर गेल्या 10 दिवसांमध्ये पावसाचे आमगन झाले. दमदार पावसामुळे पाणीसमस्या सुटली आहे. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, हुक्मकेरी तालुक्मयामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाचा काही जणांना फटका बसला आहे.
नदी, नाले प्रवाहीत
यावर्षी वळिवाने काही प्रमाणात हजेरी लावून अनेकांना संकटात टाकले होते. शेतीची मशागतीची कामे अर्धवट होती. जुलै मध्यावधीपर्यंत पावसाने हुलकाणी दिली होती. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. कधी एकदा पाऊस येतो, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून होत्या. मागील आठ दिवसांपासून पावसाने जोरदार सलामी दिली आहे. त्यामुळे आता नदी, नाले प्रवाहीत झाले. शेतकरी सुखावला आहे. या पडलेल्या पावसामुळे शेतीकामांना वेग आला आहे. यापूर्वी जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत होता. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसणार, अशी चिंता लागून होती. अनेकांनी देवांना गाऱ्हाणेही घातले. आणि त्याचे फलित झाले. पावसाने जोरदार सुऊवात केली असून अनेकांची भात पिके आता पाण्याखाली गेली आहेत. मार्कंडेय नदी परिसरात काही प्रमाणातच शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी भात रोप लागवड सुरू केली आहे. नदीकाठच्या शेतामध्ये मार्कंडेय प्रवाहीत झाल्यामुळे पाण्याची समस्या मिटली असली तरी रोप लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस काही प्रमाणात मारक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी कामात गुंतला होता. बाजारपेठेत नागरिकांनीही गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत दाखल झाले. दिवसभर उघडीप असल्याने याचा फायदा फळ, भाजी विक्रेत्यांनाही झाला.