विरोधी पक्षांच्या आरोपांना अमित शहांचे रोख-ठोक प्रत्युत्तर : जनतेचा मोदी सरकारवर पूर्ण विश्वास असल्याचा दावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत सर्वाधिक लोकांचा विश्वास जिंकणारे पंतप्रधान मोदींचे सरकार असल्याचे म्हणत मोदी हे जनतेमधील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचा दावा केला आहे. तर स्वत:च्या भाषणात मणिपूरसंबंधी वक्तव्य करत शहा यांनी विरोधी पक्षांनी मणिपूरच्या घटनेवर राजकारण केल्याचा आरोप केला. मणिपूरमधील दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन करत गृहमंत्र्यांनी विरोधकांना अशा संवेदनशील प्रकरणी राजकारण न करण्याची सूचना करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मणिपूर दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी राजकारण केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारने काही ऐतिहासिक निर्णय घेतले असून घराणेशाही अन् भ्रष्टाचाराला हद्दपार केले आहे. संपुआ ही सत्ता टिकविण्यासाठी धडपड करत होती. तर रालोआचे देशाच्या रक्षणासाठी लढण्याचे तत्व राहिले आहे. या सभागृहात एक असा सदस्य आहे, जो 13 वेळा राजकारणात उतरला आहे. हा सदस्य सर्व 13 वेळा अपयशी ठरला आहे. या नेत्याचे एक लाँचिंग मी पाहिले आहे, जेव्हा तो बुंदेलखंडमधील कलावती नावाच्या गरीब महिलेला भेटायला गेला होता. या महिलेसाठी या नेत्याने काय केले? कलावती आणि त्यांच्या कुटुंबाला घर, धान्य, वीज मोदी सरकारनचे उपलब्ध केल्याचे म्हणत शहा यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीवर निशाणा
संपुआचा इतिहास हा स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी भ्रष्टाचार करण्याचा राहिला आहे. हा अविश्वास प्रस्ताव देशात विरोधी पक्षाचे सत्य समोर आणणार आहे. देशात पंतप्रधान मोदी आणि या सरकारबद्दल कुठलाच अविश्वास नाही. हा अविश्वास प्रस्ताव केवळ भ्रम निर्माण करण्यासाठी आणला गेला असल्याची टीका शहा यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर केली आहे.
मणिपूरसंबंधी वक्तव्य
मणिपूरमधील हिंसेची घटना लाजिरवाणी आहे. महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना कुठल्याही सभ्य समाजात स्वीकारार्ह ठरणार नाही. मणिपूरमधील हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मणिपूरसंबंधी चर्चेची तयारी सरकारने पहिल्या दिवसापासून दाखविली होती. परंतु विरोधी पक्षांनी गोंधळ घालून ही चर्चा होऊ दिली नाही. मणिपूरच्या घटनेवरील चर्चेवरून विरोधी पक्षांनी खोटे दावे केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे.
दहशतवादावर प्रहार
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर तेथील दहशतवाद संपुष्टात येत आहे. मोदी सरकारने काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करविण्यासाठी सातत्याने काम केले आहे. आमच्या सरकारने दहशतवादावर प्रहार करण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला. नक्षलवादी एकेकाळी काठमांडूपासून तिरुपतीपर्यंत स्वत:चे अधिपत्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहत होते. परंतु केंद्र सरकारच्या कठोर धोरणांमुळे देशात नक्षलवादाच्या समस्येची कक्षा मर्यादित झाली आहे. मोदी सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. छत्तीसगडमध्ये नक्षली आता केवळ तीन जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
आमच्या सरकारने मागील 9 वर्षांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आणण्यास यश मिळविले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि देश पाहता पाहता 2027 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. पंतप्रधान मोदींनी विदेशात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदींना 14 देशांनी स्वत:चे सर्वोच्च पुरस्कार प्रदान केले असून भारत अन् देशवासियांसाठी ही गर्वाची बाब असल्याचे शहा म्हणाले.
राहुल गांधींकडून मणिपूरच्या घटनेवर राजकारण
राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसेच्या घटनेवर राजकारण केले. राहुल गांधी यांना चुराचांदपूर येथे हेलिकॉप्टरने जाण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते रस्तेमार्गाने चुराचांदपूर येथे जाण्यावर अडून बसले होते. तर दुसऱ्या दिवशी मात्र राहुल गांधी हे हेलिकॉप्टरने तेथे गेल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. मणिपूरवर चर्चा करण्यास मी तयार आहे, परंतु विरोधी पक्षांना ही चर्चा नको आहे. त्यांना केवळ विरोध करायचा आहे. माझ्या चर्चेने समाधान झाले नसते तर पंतप्रधानही वक्तव्य करण्यास तयार झाले असते. विरोधी पक्ष गोंधळ घालून आम्हाला गप्प करू शकतील असा विचार करत आहेत, परंतु मला ते गप्प करू शकत नाहीत असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी घेत होते आढावा
मणिपूरमध्ये परिस्थितीमुळे हिंसा झाली आहे. मणिपूरमध्ये मागील काही काळात म्यानमारमधून कुकी समुदायाचे लोक दाखल झाले आहेत. यामुळे मैतेई समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचबरोबर 29 एप्रिल रोजी 58 शरणार्थी वस्तींना जंगल गाव घोषित करण्याची अफवा पसरली. यामुळे असुरक्षितता आणि अशांतता निर्माण झाली. अशातच उच्च न्यायालयाने सरकारशी संवाद न साधत निर्णय दिल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार घडला. मणिपूरमधील हिंसेच्या प्रारंभी पंतप्रधान मोदींनी मला पहाटे 4 वाजता अन् सकाळी 6.30 वाजता फोन करत चर्चा केली होती. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही तीन दिवसापर्यंत सातत्याने काम करत होतो. या कालावधीत आम्ही 16 व्हिडिओ कॉन्फरन्स बैठका घेतल्या, 36 हजार जवान राज्यात पाठविले. राज्याचा मुख्य सचिव, पोलीस महासंचालक बदलला, राज्यात सुरक्षा सल्लागार पाठविण्यात आल्याचे शहा यांच्याकडून सभागृहाला सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून केंद्राला सहकार्य
भारत सरकारने राज्यात नवे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक पाठविले होते. 3 मे रोजी हिंसा झाली आणि 4 मे रोजी हिंसा आटोक्यात आली. विरोधी पक्ष राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही अशी विचारणा करतात. परंतु हिंसेवेळी राज्य सरकार सहकार्य करत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत असते. आम्ही केलेले बदल राज्य सरकारने स्वीकारल्याने ही वेळच आली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहे.
मैतेई अन् कुकी समुदायांना आवाहन
मैतेई अन् कुकी या दोन्ही समुदायांना चर्चेत सामील होण्याचे आवाहन मी करत आहे. हिंसा कुठल्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. आम्ही राज्यात शांतता प्रस्थापित करू असा विश्वास देऊ इच्छितो. या मुद्द्यावर राजकारण केले जाऊ नये असे शहा यांनी शांततेचे आवाहन करताना म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओसंबंधी…
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणीही शहा यांनी वक्तव्य केले आहे. हा व्हिडिओ संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर व्हायरल कसा झाला असे म्हणत शहा यांनी याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एखाद्याकडे हा व्हिडिओ होता, तर तो त्याने पोलीस महासंचालकांकडे सादर करणे गरजेचे होते, मग त्याचवेळी कारवाई झाली असती. ज्या दिवशी व्हिडिओ मिळाला, त्याचदिवशी 9 आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये मी 3 दिवस ठाण मांडून होतो. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे 23 दिवसांपर्यंत राज्यात होते. या कालावधीत आम्ही अनेक निर्णय घेतले. राज्यात स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तेथे निमलष्करी दल तैनात करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानशी चर्चा नाहीच
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणला आहे. तेथे आता कुणी एक दगडही फेकू शकत नाही. मोदी सरकार हुर्रियतशी चर्चा करणार नाही तसेच जमियतशी चर्चा करणार नाही आणि पाकिस्तानशीही चर्चा करणार नसल्याचे शाह यांनी विरोधी पक्षांना ठणकावून सांगितले आहे. चर्चा करायची असल्यास ती खोऱ्यातील तरुणाईशी करू असे शहा यांनी म्हटले आहे.