वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर : पॅटालिन पॅरिको, ड्य्रू वेइसमन यंदाचे मानकरी
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
यावषीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली. याअंतर्गत पहिल्या दिवशी मेडिसिन (वैद्यकशास्त्र) या क्षेत्रासाठी या सन्मान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यंदा पॅटालिन पॅरिको आणि ड्य्रू वेइसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक घोषित झाले आहे. न्यूक्लिओसाईड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या शोधामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच कोविड-19 विरुद्ध प्रभावी ‘एमआरएनए’ लस विकसित करण्यास मदत झाली होती.
नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा केली. पॅटालिन पॅरिको आणि ड्य्रू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले. गेल्यावर्षी स्वीडनच्या स्वांते पॅबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
पॅटालिन पॅरिको आणि ड्य्रू वेइसमन यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे, ‘एमआरएनए’ ही लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते याबाबत माहिती मिळवण्यास मदत झाली होती. 2019-2020 मधील कोरोना संसर्गाचा काळ मानवी जीवनासाठी अत्यंत कठीण ठरला होता. त्या काळामध्ये एक महत्त्वपूर्ण लस विकसित करण्यासाठी पॅटालिन पॅरिको आणि ड्य्रू वेइसमन यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतल्यामुळे त्यांना 2023 चा वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
नोबेल पारितोषिकांची घोषणा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सुरू झाली आहे. आता मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुऊवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. याशिवाय नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील विजेत्याची घोषणा 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
नोबेल पुरस्काराची व्याप्ती
वर्षभरात मानवतेसाठी मोलाचे कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतो. हा पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर किंवा 10 लाख यूएस डॉलर्सचे रोख पारितोषिक दिले जाते.