पाण्यात मिसळली धोकादायक किरणोत्सर्गी सामग्री ः चीनवरही परिणाम
वृत्तसंस्था/ सोल
उत्तर कोरिया सातत्याने आण्विक चाचण्या करत आहेत. यामुळे केवळ उत्तर कोरियातील लोक नव्हे तर दक्षिण कोरिया, जपान आणि चीनमध्ये राहत असलेल्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. भूमिगत आण्विक चाचणी केंद्रातून बाहेर पडणारी किरणोत्सर्गी सामग्री पाण्यात मिसळून या देशांमध्ये पोहोचत आहे.
ही किरणोत्सर्गी सामग्री केंद्रानजीकच्या 3 देश आणि 8 शहरांमध्ये पोहोचली आहे. उत्तर कोरियात आण्विक केंद्रानजीक राहत असलेल्या सुमारे 10 लाखाहून अधिक लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी भूजलावर अवलंबून आहेत. याचबरोबर उत्तर कोरियातून तस्करीमार्गे पोहोचणारी कृषी तसेच मत्स्यपालनाशी निगडित उत्पादनांमध्ये देखील किरणोत्सर्गी घटक असावेत अशी भीती सोल येथील एका मानवाधिकार गटाने व्यक्त केली आहे.
9 पट अधिक रेडियोऍक्टिव्ह सीजियम
अमेरिका आणि दक्षिण कोरियानुसार उत्तर कोरियाने 2006 पासून 2017 दरम्यान पुंग्यी-री केंद्रावर सुमारे 6 चाचण्या केल्या आहेत. हे केंद्र उत्तर कोरियाच्या हॅमग्योंग प्रांतात जमिनीखाली आहे. 2015 मध्ये दक्षिण कोरियाच्या फूड सेफ्टी एजेन्सीला चीनमधून आयात करण्यात आलेल्या मशरूममध्ये सामान्य पातळीपेक्षा 9 पट अधिक रेडिओऍक्टिव्ह सीजियम आढळून आले होते. हे मशरूम उत्तर कोरियातून चीनमध्ये पोहोचले होते.
उत्तर कोरियाने फेटाळली भीती
चीन आणि जपानने देखील उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक चाचण्या पाहता किरणोत्सर्गाव नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खाद्यसामग्रीमध्ये किरणोत्सर्गी घटक मिसळले जाण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु उत्तर कोरियाने पेयजलात ही सामग्री पोहोचली नसल्याचा दावा केला आहे. कुठल्याही आण्विक चाचणीदरम्यान कधीच गळती झालेली नसल्याचे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.
लोकांचे पलायन
2018 मध्ये आण्विक चाचणी कें द्रावर काही भुयारांची स्थिती पाहण्यासाठी विदेशी पत्रकार उत्तर कोरियात पोहोचले होते. तेव्हा त्यांचे रेडिएशन डिटेक्टर्स जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तेथे डिफेक्टर्स (किरणोत्सर्ग गळतीशी निगडित तपासणी करणारे उपकरण) देखील रोखण्यात आले होते. 2017-18 मध्ये पुंग्यी-री केंद्रानजीक लावण्यात आलेल्या 40 डिफेक्टर्सपैकी 9 मध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. वाढत्या आण्विक चाचण्यांदरम्यान 2006 पासूनच परिसरात राहणाऱया 880 लोकांनी पलायन केले आहे.