क्रीडा मानसशास्त्रज्ञांकडून विश्वचषक अंतिम फेरीतील भारताच्या पराभवाचे विश्लेषण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताला अंतिम फेरीत बाजी मारून विश्वचषक जिंकता न आल्याची कुरकुर रविवारी रात्रीपासूनच वाढली आहे, परंतु अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहून वाटचाल करणारा हा संघ प्रत्यक्षात दडपणाखाली गडबडला की, रविवारचा दिवस त्यांच्यासाठी वाईट गेला हा प्रश्न आता सर्वांकडून चर्चिला जाऊ लागला आहे. रविवारी एक अब्जाहून अधिक भारतीय क्रिकेट रसिकांची भीती खरी ठरली आणि ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात परिपूर्ण खेळ करून तोवर एकही पाऊल चुकीचे न टाकलेल्या भारताचे आव्हान मोडीत काढले.
साखळी फेरी व उपांत्य फेरीतील मिळून सलग 10 विजयांनंतर भारताची दौड पुन्हा एकदा अंतिम फेरीत येऊन थांबली. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारताने पाच आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने आणि तीन उपांत्य सामने गमावलेले आहेत. अंतिम फेरीपूर्वी भारताने राखलेले वर्चस्व लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चेहऱ्यावर पसरलेले उदास भाव समजण्यासारखे होते. कारण या दोन महान खेळाडूंना माहीत आहे की, एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची आणखी संधी मिळणे त्यांना कठीण आहे.
परंतु जागतिक स्तरावर भारताच्या पदरी अंतिम टप्प्यात वारंवार येणारे अपयश वरील प्रश्न उपस्थित करून गेले आहेत. क्रीडा मानसशास्त्रज्ञ गायत्री वर्तक, ज्या उच्चभ्रू भारतीय खेळाडूंसोबत काम करतात, त्यांना असे वाटते की, हे दबावाखाली कोलमडण्याचे प्रकरण नाही तर ऑस्ट्रेलिया केवळ डावपेचांच्या बाबतीत वरचढ राहिली. मला वाटत नाही की, संघ मानसिकदृष्ट्या कोलमडल्याचा कोणताही शुद्ध पुरावा आहे. ते दबावामुळे गडबडले किंवा कामगिरी करू शकले नाहीत असेही मला वाटत नाही. ते सर्व जण सकारात्मक पद्धतीने स्पर्धेत उतरले होते आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना त्यांची कामगिरी धडाकेबाज राहिली होती. एक खेळाडू म्हणून तुमचे मन मागील शेवटच्या सामन्याचा संदर्भ घेते. तीन वर्षांपूर्वी फायनलमध्ये काय घडले ते नव्हे. मागील शेवटचा सामना हा उपांत्य फेरीतील होता, जो त्यांनी जिंकला होता, याकडे वर्तक यांनी लक्ष वेधले.
फोर्टिस रूग्णालयातील क्रीडा मानसशास्त्रज्ञ दिव्या जैन म्हणाल्या की, महत्त्वाच्या सामन्याचा दबाव प्रमुख खेळाडूंवरही परिणाम करू शकतो. परंतु भारताची कामगिरी साजरी केली पाहिजे. कोणत्याही संघासाठी एखादा दिवस वाईट जाऊ शकतो. ते स्वीकारणे आणि त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाकडे एक योजना होती आणि ते त्यास चिकटून राहिले, त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवला आणि स्वत:ला झोकून दिले. बड्या सामन्यांच्या दबावाचा परिणाम होऊ शकतो आणि मानसिक तयारी ही महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले. असे असले, तरी ही विश्लेषणाची वेळ नाही, ही यश साजरे करण्याची वेळ आहे. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणे आणि 10 सामने जिंकणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, असे जैन यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या मते, हा नक्कीच कौशल्याचा प्रश्न नाही. त्यामुळे हा फक्त संधी आणि मानसिकतेचा प्रश्न असायला हवा, असे त्यांनी सांगितले. सतत धडाकेबाज कामगिरी करून उन्मादात राहिल्यानंतर जिंकणे थोडे कठीण होते, यावर वर्तक देखील हेडनशी सहमत झाल्या.