वाहतुकीतील बेशिस्तपणा मोडून काढण्यासाठी नवा उपाय : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची आजपासून कार्यवाही
पणजी : रस्ता वाहतुकीतील बेशिस्ती आणि अनागोंदी नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आजपासून राज्यात वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई प्रारंभ होत आहे. ही प्रक्रिया ’आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ च्या माध्यमातून होत असली तरी या संपूर्ण प्रणालीचे ’आऊटसोर्सिंग’ करण्यात आल्यामुळे एकप्रकारे लुटमार तर ठरणार नाही ना असा संशय वर्तविण्यात येत आहे. रस्ता अपघात आणि त्यात जाणारे बळींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहनचालकांना कितीही समजावले, जागृती केली, भीती घातली तरी ’जळालेल्या सुंभाचा पीळ’ काही जात नाही, असा प्रकार सध्या होत आहे.
पर्यटकांचाही वाहतुकीत बेशिस्तपण
लोकसंख्येपेक्षा जादा वाहने असलेल्या गोव्यासारख्या लहान राज्यात प्रत्येक चालकावर लक्ष ठेवणे पोलीस यंत्रणेस शक्यही होत नाही. भरीस ’रेन्ट अ बाईक’ आणि ’कार’चा वापर बेसुमार वाढला असून त्यातील बेशिस्त-अनागोंदी परमोच्च स्तरावर पोहोचली आहे. ही वाहने वापरणारे पर्यटक तर गोवा म्हणजे ’रस्ता वाहतुकीचे कोणतेही नियम नसलेले राज्य’ असाच समज करून फिरत असतात. त्यांच्या एक पाऊल पुढे जाताना स्वीगी, झोमेटो, डोमिनो यासारख्या घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी रस्त्यावर वावरत असतात. आपण वेळेवर पोहोचलो नाही तर एखाद्याचा भुकेने तडफडून मृत्यू होईल, अशा घाईगडबडीत प्रसंगी स्वत:चा जीव सुद्धा धोक्यात घालून ते दुचाकी हाकत असतात. हे सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत घडत असतात.
वाहनचालक परवाना होणार निलंबित
असे अनेक प्रकार निदर्शनास आल्यानंतर रस्ता वाहतुकीशी संबंधित विविध प्रकारच्या गुह्यांसाठी दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अती गती, सिग्नलकडे डोळेझाक, चालकाने मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून चालविणे, मालवाहू गाडीत क्षमतेपेक्षा जादा माल भरणे किंवा प्रवासी वाहतूक करणे, यासारख्या गुह्यांचा समावेश असून त्यात सापडणाऱ्या चालकाचा परवाना थेट तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे.
दंडाची रक्कम दहा हजारपर्यंत
विना परवाना वाहन चालविणे, नो एन्ट्री, नो पार्किंग, अनधिकृत ठिकाणी/धोकादायक पार्किंग, विना हेल्मेट/सीटबेल्ट न घालता चालविणे, काळ्या काचा, फेन्सी क्रमांकपट्ट्या, यासारख्या गुह्यांसाठीही दंड आणि शिक्षेची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम गुह्याच्या स्वऊपानुसार ऊ. 500 पासून 10 हजार पर्यंत असणार आहे.
वाहनचालकाच्या घरी येणार तालांव
हे सर्व प्रकार हाताळण्यासाठी पणजी, पर्वरी आणि सभोवतालच्या परिसरात 13 ठिकाणी ’आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आज 1 जूनपासून तिचे कार्य सुरू होणार असून त्यातील अती प्रगत सीसीटीव्ही कॅमेरे वाहनचालकांवर करडी नजर ठेवणार आहेत. त्यात किंचितसुद्धा चूक आढळल्यास थेट वाहनचालकाच्या घरी तालांव पोहोचणार आहे.
राज्यभरात वाढवणार यंत्रणेची व्याप्ती
सध्या ही यंत्रणा 13 ठिकाणी बसविण्यात आली असली आणि काही दिवस तिचा प्रायोगिक तत्वावर वापर होणार असला तरी भविष्यात तिची व्याप्ती राज्यभरात वाढविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
कायद्यात राहूनच वाहन चालविणे गरजेचे
असे असले तरी या संपूर्ण प्रणालीचे ’आऊटसोर्सिंग’ अर्थात एकप्रकारे खाजगीकरणच करण्यात आल्यामुळे सदर कंपनी कुणालाही दयामाया दाखवणार नाही. घडला गुन्हा-दिला दंड अशीच त्यांची कार्यपद्धती राहणार आहे. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने स्वत:च्या ’उधळलेल्या वारूचा लगाम खेचत’ कायद्याच्या चौकटीतच वाहन चालविणे त्यांच्याच हिताचे ठरणार आहे.
यंत्रणेच्या आऊटसोर्सिंगवरुन खात्यांमध्ये धूसफूस
प्राप्त माहितीनुसार या प्रणालीच्या ’आऊटसोर्सिंग’ वरून मंत्रीस्तरावर ’इंटरनल’ धूसफूस सुरू झाल्याचे वृत्त आहे. ज्या खात्याच्या माध्यमातून हे सर्व होणे अपेक्षित होते त्या खात्याला डावलून भलत्याच खात्याने हे आऊट एन्ड आऊट ’आऊटसोर्सिंग’ केले आहे. त्यामुळे त्यात ’दाल मे कुछ काला’ असल्याच्या संशयास पुष्टी मिळाली आहे.