येळ्ळूरसह परिसरातील शेतकऱ्यांना दिल्या नोटिसा, शेतकऱ्यांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडसाठी जागा कब्जात घेण्याबाबत येळ्ळूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हरकती दाखल केल्या असताना त्या हरकती फेटाळल्या आहेत. त्यामुळे आम्ही रिंगरोडसाठी सदर जमीन कब्जात घेत असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावांच्या जमिनी घेण्यात येणार आहेत. जमीन घेण्याबाबत नोटिफिकेशन करण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पूर्णपणे विरोध केला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, अशा हरकती दाखल केल्या होत्या. मात्र त्या सर्व हरकती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्या होत्या.
शेतकऱ्यांनी कायद्याच्या चौकटी या सर्व हरकती नोंदविल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दंडाधिकाऱ्यांनी दावा फेटाळल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याबाबतची कागदपत्रे द्यावी, अशी मागणी केली. मात्र आजतागायत दावा फेटाळल्याबाबतची कागदपत्रे दिली गेली नाहीत. जाणूनबुजून टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर आता येळ्ळूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांना जागा कब्जात घेण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर रोड हा पुढच्या 30 वर्षांच्या रहदारीचा विचार करून करण्यात येणार आहे. जनतेसाठी हा रस्ता करण्यात येणार आहे. तेव्हा सदर जमिनी घेणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
शहरामधील वातुकीची कोंडी कमी करण्यासाठी आम्ही रिंगरोड करत आहोत. त्यामुळे तुमची जमीन घेतली जाणार आहे. यापूर्वी तुम्ही जो अर्ज केला होता तो रद्दबातल ठरविण्यात आला आहे, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नावे शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा न्यायालयीन लढ्याबरोबरच रस्त्यावरील लढाई लढावी लागणार आहे.