100 किलोपेक्षा अधिक कचऱयाची उत्पत्ती करणाऱया व्यावसायिकांची यादी महानगरपालिकेकडून तयार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाचे प्रमाण वाढत असून दररोज 250 ते 280 टन कचरा जमा होत आहे. पण शहरात मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण करणाऱया नागरिकांची व व्यावसायिकांची माहिती महापालिकेने जमा केली आहे. 220 हून अधिक व्यावसायिक आस्थापनांकडून मोठय़ा प्रमाणात ओल्या कचऱयाची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, अशी नोटीस महापालिकेने व्यावसायिकांना बजावली आहे.
ओला व सुका कचरा जमा करण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येते. ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेंतर्गत घरोघरी जावून कचरा जमा केला जातो. पण शंभरहून अधिक किलो कचरा जमा झाल्यास कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांची आहे. त्यामुळे 100 किलोहून अधिक कचऱयाची उत्पत्ती करणाऱया व्यावसायिकांची यादी महानगरपालिकेने तयार केली आहे. शहरातील भाजी मार्केट, प्रूट मार्केटसह काही हॉटेल व्यावसायिकांचा समावेश यामध्ये आहे. 220 हून अधिक व्यावसायिकांचा समावेश असून 25 टनांहून अधिक कचरा जमा होतो.
हरितलवाद कायदा आणि महापालिका कायद्यानुसार 100 टनांहून अधिक कचऱयाची उत्पत्ती झाल्यास त्या कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित संस्था किंवा व्यावसायिकांची आहे. कचऱयाची विल्हेवाट संबंधित व्यावसायिकांनी लावावी, अशा प्रकारच्या नोटिसा यापूर्वी महापालिकेने बजावल्या होत्या. ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी खत निर्मिती प्रकल्प किंवा बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प राबविण्याची सूचना महापालिकेने केली होती. पण याची अंमलबजावणी शहरातील हॉटेल व्यावसायिक किंवा कचरा उत्पत्ती करणाऱया संस्थांनी केली नाही.
220 हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा
100 किलोहून अधिक कचरा उत्पत्ती करणाऱया व्यावसायिकांकडील कचऱयाची उचल यापुढे महापालिकेने करू नये, अशी सूचना हरितलवादाच्या अध्यक्षांनी केली आहे. त्यामुळे हॉटेल, भाजी मार्केट किंवा अन्य व्यावसायिकांकडील कचऱयाची उचल महापालिका करणार नाही. जमा होणाऱया कचऱयावर संबंधित व्यावसायिकांनी प्रक्रिया करून कचऱयाची विल्हेवाट लावावी, अशी सूचना केली आहे. याबाबतच्या शहरातील 220 हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांकडील कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी तत्त्वावर बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत हॉटेलचालकांची बैठक झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी लागणार आहे. यापूर्वी वैद्यकीय कचऱयाची उचल करण्याचे काम महापालिकेने बंद केले आहे. त्याचप्रमाणे हॉटेलमधील व मोठय़ा प्रमाणात कचऱयाची उत्पत्ती करणाऱया संस्थांकडील कचऱयाची उचल महापालिकेने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.