सध्याचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे अशी मान्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आजवर कल्पनेतही शक्य न झालेली अचाट कामे करता येतात हे सिद्ध झाले आहे. प्राण्यांची भाषा आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण त्यांच्याशी केवळ खाणाखुणांनी किंवा काही सांकेतिक शब्दांच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. तथापि या संवादालाही अनेक मर्यादा पडतात.
मात्र, जनावरांशीही मानसांप्रमाणे संवाद साधणे आता शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने ही सोय करून दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून या संबंधीचे प्रयोग शास्त्रज्ञांकडून केले जात आहे. जनावरांची भाषा आता माणसांचीही भाषा होणे अशक्य राहिलेली नाही, असे वैज्ञानिकांचे मत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण जनावरांच्या पुष्कळ जवळ आलो असून त्यांची भाषा शिकणेही आता अशक्य राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने आता अशी साधणे बनवणे शक्य होणार आहे की ज्यांच्या साहाय्याने जनावरांची भाषा जाणून घेऊ शकू.
सध्या यासंबंधीचे प्रयोग मधमाशांवर सुरू आहेत. मधमाशी हा समूहाने राहणारा अनेक सातत्याने कष्ट करणारा जीव आहे. समूहाने मध गोळा करण्याचे आणि तो साठवण्याचे काम करताना तसेच मध साठवण्यासाठी पोळे तयार करताना मधमाशांना एकमेकींमध्ये संवाद ठेवावा लागतो. या संवादासाठी त्या जी भाषा वापरतात तिचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संवाद ‘डीकोड’ झाल्यास माणसालाही मधमाशांशी संवाद साधणे शक्य होईल. तशी साधणे प्राथमिक स्वरुपात विकसित करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यात सुधारणे होणे आवश्यक आहे. लवकरच जनावरांची भाषा माणसाला जाणवून देणारी साधणे निर्माण करणे शक्य होणार असून ती एक मोठी क्रांती ठरणार आहे.