पालकमंत्र्यांच्या बैठकीत पतीदेवांचा तोरा अधिक
बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांची संख्या पुरुषांबरोबरच झाली आहे. मात्र महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीदेवच कारभार सांभाळत असल्याच्या घटना वारंवार उघडकीस आल्या आहेत. बुधवारीही महानगरपालिकेमध्ये हाच प्रकार साऱ्यांच्या नजरेस दिसून आला. नगरसेविकांच्या पतींनीच सभागृहातील खुर्ची काबीज केल्याचे दिसून आले. यामुळे आता कारभारी जरा दमानंच म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महापालिकेमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर, उपमहापौर यांसह नगरसेवकांना उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. पालकमंत्री बैठक घेणार असल्यामुळे सर्वच नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. नगरसेविकांचे पतीदेवही अत्यंत रुबाबात सभागृहात दाखल झाले होते. म्हणणे मांडताना नगरसेविकांऐवजी पतीदेवच म्हणणे मांडण्यासाठी पुढे येत होते. त्यामुळे वेगळीच चर्चा सभागृहात होती.
यापुढे तरी पतीदेव सुधारतील का?
बैठक झाल्यानंतर नगरसेवक, अधिकारी व महनीय व्यक्तींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणीही नगरसेविकांच्या पतीदेवांनी उपस्थिती दर्शवून चांगलाच ताव मारला. यावेळी इतर नगरसेवक मात्र कुजबुज करत होते. कायद्यानुसार पत्नी नगरसेविका किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्या असताना पतीदेवांनी हस्तक्षेप करणे हा गुन्हाच आहे. त्यामुळे यापुढे तरी असे पतीदेव सुधारतील का? अशी चर्चा रंगली होती.