मनपाच्या बैठकीत ठराव मंजूर : सरकारच्या आदेशानुसार निर्णय
बेळगाव : शहरातील घरपट्टी वाढविण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, तसा ठराव करून त्याला मंजुरी देण्यात आली नव्हती. मात्र, शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये 3 ते 5 टक्के घरपट्टी वाढविण्याचा ठराव करण्यात आला असून त्याला सत्ताधारी व विरोधकांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता बेळगावकरांना घरपट्टीचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ही घरपट्टीवाढ 2023 पासूनच करण्याचेही या सर्वसाधारण बैठकीत चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. घरपट्टीवाढीचा ठराव करण्याबाबत नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांनी प्रस्ताव मांडला. त्याला नगरसेवक रवी धोत्रे यांनी अनुमोदन दिले. यावेळी विरोधी गटातील नगरसेवक अजीम पटवेगार यांनी घरपट्टी वाढीबाबत नेमके कारण काय? असे विचारले असता महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी राज्यातील सर्वच महापालिकांनी ठराव केला असून त्या पद्धतीने घरपट्टी वसुली केली जात आहे. बेळगावात मात्र त्याला बराच उशीर झाला आहे. 2019 पासूनच राज्यातील नऊ महापालिकेच्या हद्दीमधील घरपट्टी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांच्या सहमतीने ठराव
सरकारचाच आदेश असल्यामुळे त्याला कोणीच काही करू शकत नाही. वास्तविक 2021 पासून ती वाढ होणे गरजेचे होते. मात्र, सर्वांनीच विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. आमदार राजू सेठ यांनीही सरकारचा आदेश असल्यामुळे त्याला सर्वांनीच मंजुरी दिली आहे आणि घरपट्टी वाढीसाठी त्यांनीही होकार दिला आहे. जोपर्यंत घरपट्टी वाढ केली जात नाही, तोपर्यंत महापालिकेला अनुदान मिळणे कठीण आहे, असे देखील आमदारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे तातडीने हा ठराव करून त्याला सर्वांनीच मंजुरी देण्यात आली आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी अजेंड्यावर असलेल्या या मुख्य प्रश्नावर चर्चा करण्याबाबत सभागृहास सांगितले. त्यानंतर तातडीने त्याला मंजुरीही देण्यात आली आहे.
महापौर व सभागृहाचा पुन्हा अवमान
कोणताही प्रश्न उपस्थित करण्यासाठी महापौरांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली पाहिजे. मात्र, सत्ताधारी गटातील काही उत्साही नगरसेवक महापौरांनाच हा प्रस्ताव मंजूर करा, असे सांगत होते. त्यामुळे नगरसेवक अजीम पटवेगार यांनी तुम्हीच प्रस्ताव मांडायला, तुम्हीच त्याला नकार देता, त्यानंतर पुन्हा तुम्हीच त्याला मंजूर करा म्हणता, हे सभागृहाला शोभणारे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे सभागृहामध्ये पुन्हा बेशिस्तपणा आढळून आला. त्याचबरोबर महापौरांचा अवमानही झाल्याचे दिसून आले. यावेळी आमदार राजू सेठ यांनीही सभागृह चालविण्याबाबत प्रत्येकानेच अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाल्यानंतर महापौरांनी त्यावर निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, नगरसेवकच हा प्रस्ताव मंजूर करा, असे सांगत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.