स्वरक्षणासाठी अण्वस्त्र डागण्यास हयगय करणार नाही ः विदेशमंत्री
वृत्तसंस्था / मॉस्को
युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आण्विक हल्ला करण्याची आमची कुठलीच योजना आही, परंतु आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्यास हयगय करणार नसल्याचे रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी पाश्चिमात्य देशांवर ‘न्युक्लियर ब्लॅकमेल’चा आरोप केला होता. नाटोचे काही मोठे नेते रशियाच्या विरोधात अण्वस्त्र वापरण्याची धमकी देत असल्याचा दावा त्यांनी केला होता. पाश्चिमात्य देश अण्वस्त्र वापरावरून आम्हाला ब्लॅकमेल करत असल्यास रशिया देखील स्वतःच्या पूर्ण शक्तिनिशी प्रत्युत्तर देणार आहे. आमच्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो असे पुतीन यांनी म्हटले होते.
8 ऑक्टोबर रोजी युक्रेनने रशियाचा कर्ज ब्रिज नष्ट केला होता. हा ब्रिज रशियाला क्रीमियाशी जोडणारा होता. याचा सूड उगवत रशियाने 48 तासांनी युक्रेनवर 83 क्षेपणास्त्रs डागली होती. ही क्षेपणास्त्रs कीव्ह शहरावर डागण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रशियाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्ये पाहता आता कीव्हमधील नागरिक संभाव्य आण्विक हल्ल्याकरता तयारी करत आहेत. येथील रहिवासी आण्विक हल्ल्यादरम्यान सुरक्षित कसे रहावे याची माहिती मिळवत आहेत.
पोटॅशियम आयोडाइडच्या गोळय़ा
मेडिकल रिकमंडेशनच्या तळावर आण्विक हल्ला झाल्यास लोकांना पोटॅशियम आयोडाइडच्या गोळय़ा देण्यात येणार आहेत. या गोळय़ा शहरातील औषध दुकानांमध्येही मिळत असल्याचे कीव्ह सिटी कौन्सिलकडून सांगण्यात आले. दररोज लोक या गोळय़ांच्या शोधात येत आहेत, परंतु ते आण्विक हल्ल्याबद्दल घाबरलेले नव्हते असे कीव्हमधील फार्मासिस्ट अलीना बोझेदोमोवा यांनी सांगितले आहे.
शाळांमध्येही तयारी
काही शाळांनी देखील पालकांना मुलांसोबत इमर्जन्सी पॅक तयार ठेवण्यासाठी सूचना केली आहे. यात लेटेक्सचे ग्लोव्ह्ज, पोंचो, बूट कव्हर, टिश्यू पेपर, वेट वाइप्स आणि फ्लॅश लाइट्स सामील असल्याचे समजते. तसेच शाळांच्या परिसरातील भूमिगत बंकर्समध्ये अन्न अन् पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
हवाईसुरक्षा यंत्रणेची मागणी
रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जी-7 ची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. यात युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी हवाई सुरक्षा यंत्रणेची मागणी केली आहे. तसेच जी-7 देशांना बेलारुस सीमेवरील मोहिमेला सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. रशियाचे हल्ले वाढत असून निर्दोष लोक मारले जात आहेत. रशियाकडून लोकांची घरे आणि शाळांना लक्ष्य करण्यात येत आहे. रशियाच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला त्वरित हवाई सुरक्षा यंत्रणेची गरज असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.