100 दिवसांमध्ये 2 लाखापेक्षा अधिकने घट
नवी दिल्ली
नेटफ्लिक्सने मागील काही तिमाहीमध्ये नुकसान सहन करत आपला प्रवास केला आहे. यामध्ये प्राप्त अहवालानुसार चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सची ग्राहक संख्या कमी होत गेल्याची माहिती आहे. जवळपास 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे तब्बल 2 लाखपेक्षा अधिकचे सबस्क्राईबर्स कमी झाले आहेत.
कंपनीच्या इतिहासात अशी स्थिती प्रथमच निर्माण झाल्याची नोंद यावेळी करण्यात आली आहे. 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीच्या दरम्यान नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या घटून 22.16 कोटी झाली आहे. जी मागील वर्षातील समान तिमाहीच्या दरम्यान तुलना केल्यास काहीशी कमी आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
नेटफ्लिक्सने यावेळी दावा केला आहे, की ग्राहक घटण्यामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा फटका अधिकप्रमाणात बसल्याचे संकेत आहेत. नेटफ्लिक्सने रशियामध्ये आपली सेवा बंद केल्यानंतर सोबत युक्रेनमधील सेवाही युद्धामुळे प्रभावीत झाल्याची माहिती आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोविडच्या वातावरणात लोक जास्तीत जास्त प्रमाणात वर्क फ्रॉम होम करत होते. ज्यामुळे वर्ष 2020 मध्ये कंपनीला चांगला व्यवसाय करता आला.