आपल्या हौशी किंवा फॅड पूर्ण करण्यासाठी लोक काय काय करतील आणि त्यासाठी किती पैसा खर्च करतील याचा नेम काही, अशी परिस्थिती आहे. एकदा एखादी बाब मनात ठसली की ती प्रत्यक्षात उतरविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तसेच हे करण्यासाठी ते कितीही पैसा खर्च करण्यासाठी सज्ज असतात, आपली कार किंवा दुचाकी यांचा नंबर किंवा वाहन क्रमांक हा अनेकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात त्यांच्या काही शुभशकून किंवा अपशकून अशा भावनाही दडलेल्या असतात. विशिष्ट वाहन क्रमांक हे तर अनेकांचे ‘ऑब्सेशन’ असते. उद्राराखंडमधील उधमसिंग नगर येथील एका नागरीकाने आपल्या वाहनासाठी विशिष्ट क्रमांक मिळविण्यासाठी त्या वाहनाच्या किमतीपेक्षाही अधिक पैसे मोजले आहेत. नुकतीच ही बाब उघड झाली आहे.
येथील वैभव छाबडा यांनी नुकतीच थार श्रेणीतील कार घेतली आहे. तिची किंमत साधारणत: 11 लाख रुपये आहे. या कारसाठी त्यांना 0001 हा क्रमांक हवा होता. यासाठी त्यांनी अशा वैशिष्ट्यापूर्ण क्रमांक मिळविण्यासाठीच्या लिलावात भाग घेतला आणि 0001 हा क्रमांक तब्बल 12 लाख 70 हजार रुपये मोजून मिळवला आणि आपली हौस पूर्ण केली. याच प्रमाणे याच विभागात अशा 20 क्रमांकाची विक्री लिलावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.